सोलापूर : आपला अभ्यास बरा अन् आपण... अशा साधारण धारणेने गंभीरपणे अभ्यास करणार्या मुलींनी बारावीच्या परीक्षेत यंदाही बाजी मारली असून, सोलापूर जिल्ह्यात ९३.९८ टक्के मुली यशस्वी झाल्या; तर ८५.६८ टक्के मुले यशस्वी झाली आहेत. सोलापूर जिल्ह्याचे उत्तीर्णांचे प्रमाण ८९.०२ टक्के इतके आहे. महाराष्टÑ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर झाला. मुलींच्या यशावर दृष्टिक्षेप टाकला असता या परीक्षेत १७,५६० विद्यार्थिनींनी बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरले. त्यापैकी १७,५२० मुलींनी परीक्षा दिली. त्यामध्ये १६,४६५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.९८ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १२.९३ टक्के अधिक आहे. सन २०१३ च्या परीक्षेत १६,९३० मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,७५५ जणींनी परीक्षा दिली; तर १३,५८० मुली उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ८१.०५ टक्के होते. यंदाच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये ४३,५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ४३,४७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३८,७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.०२ टक्के आहे. या परीक्षेत २६,००५ मुलांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी २५,९५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २२,२३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.६८ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २०.४८ टक्के अधिक मुले उत्तीर्ण आहेत
-----------------------------
टक्का वाढला...
यंदाच्या परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण वाढले असून, गतवर्षीच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १२.९३ टक्क्यांनी; तर मुलांचे प्रमाण २०.४८ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल ७१.५४ टक्के होता; यंदा ८९.०२ टक्के इतका निकाल आहे. परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र यंदा घटली आहे. गेल्या वर्षी ४३,५१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती; यंदा ४३,४७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते
. ---------------------
नेटकॅफेवर गर्दी...
बारावीचा निकाल आता परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर होत असल्यामुळे सोलापूर शहरातील वेबसाईटवर निकाल पाहणे आणि गुणपत्रिका डाऊनलोड करून तिची प्रिंटआऊट घेण्यासाठी नेटकॅफेवर मोठी गर्दी झाली होती. गुणपत्रिकेत एकूण गुणांच्या बेरजेखाली ‘अभिनंदन तुम्ही उत्तीर्ण आहात’ असे इंग्रजीमध्ये लिहिलेले होते. विद्यार्थ्यांची नजर प्रत्येक विषयाच्या गुणाच्या कॉलमवर जाण्याऐवजी प्रथम ते शेवटच्या कॉलमकडे पाहून ‘पास की नापास’ हे जाणून घेताना दिसले. अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांसह, परिवारासह निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेकडे येताना दिसले.