निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
By आशपाक पठाण | Published: June 18, 2024 07:52 PM2024-06-18T19:52:31+5:302024-06-18T19:52:56+5:30
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाढवाची वरात...शासनाच्या दारात... अशी घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला
निलंगा : शहरातील विविध विकास कामात प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाढवाची वरात...शासनाच्या दारात... अशी घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.
निलंगा शहरातील सार्वजनिक बंद पडलेले बोअरवेल चालू करावे, शहरातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, नाल्या न बांधता दत्तनगर ते दादापीर दर्गा रस्ता तयार करण्यात यावा, निळकंठेश्वर यार्डात पाऊस पडला की चिखल होतो येथे कचखडी टाकण्यात यावी, औरंगपुरा व इतर भागातील नाली व पूल तुटले आहेत. तसेच रस्त्यातील नाल्यावरील लोखंडी जाळ्या खराब झाल्या आहेत. त्या तत्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, शहरातील ९० टक्के रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झाले असून चौकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, शहराध्यक्ष मुजीब सौदागर, गिरीश पात्रे, अनिल पाटील, मुजमिल सितारी, जाकिर शेख, मुस्ताक शेख, नागेश राघो, शहानवाज शेख, शफीक शेख , विश्वनाथ सूर्यवंशी, गौस सैय्यद, बाबा बिबराळे, हणमंत पाटील, शुभम पाटील, अमीर पाटेवाले, विलास कांबळे, अमोल नवटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.