सोलापूर: महोत्सव जवळ आलाय...जिल्ह्यातल्या साºया महाविद्यालयात कडकडाट... टांगटिंग...मधुर सुरावटींची लकेर उमटू लागलीय. तरुणाई प्रत्येक कलाप्रकार मनापासून सादरीकरणासाठी गुंतलीय. आता जिंकायचंच या इर्षेने पेटून उठलीय. त्यातच प्राध्यापकांचाही संप मिटल्याने गुरुवारपासून त्यांचा सहभाग लाभणार आहे.
विद्यापीठ युवा महोत्सवात नेहमीच बाजी मारलेल्या सलग १० वेळा सर्वसाधारण विजेतेपद मिळवलेले शिवाजी महाविद्यालय यंदाही सज्ज झाले आहे. वाङ्मय, पथनाट्य कलाप्रकारात हॅट्ट्रिक साधण्यासाठी तयारी सुरु आहे. दिग्दर्शक अमर देवकर,प्रकाश शिंदे, प्रा. पंकज पवार, प्रा. राहुल पालखे, रवींद्र सुतकर, विक्रांत चौहान आणि संघ व्यवस्थापक प्रा. सुधीर पैकेकर, डॉ. उषा गव्हाणे, सांस्कृतिक चेअरमन प्रा. अबोली सुलाखे, प्रा. डॉ. प्रकाश थोरात या तगड्या मार्गदर्शक मंडळींच्या जोरावर कलावंतांनी तालमीसाठी सर्व कलाप्रकारासाठी रंग भरला आहे. महोत्सवातून अनेक चित्रपट, नाट्य कलावंत महाराष्टÑाला मिळाले आहेत.
अकलूजच्या ग्रीनफिंगर्सनेही यंदा महोत्सवात बाजी लावण्यासाठी कसून तयारी चालवली आहे. मूकनाट्य, एकांकिका, पथनाट्य व वैयक्तिक अशा १६ कलाप्रकारासाठी सहभागी झाले आहेत. ताकदीने कला सादरीकरणासाठी सर्वच विद्यार्थी सकाळी १०पासून सायंकाळपर्यंत सराव करीत असल्याचे प्रा. मनोज वर्दन यांनी सांगितले. युवा कलावंतांच्या कलागुणांसाठी महोत्सव आहे ही जाणीव ठेवून विद्यार्थी तयारीला लागल्याचेही अविनाश पिसे यांनी स्पष्ट केले.
सांगोला महाविद्यालयाला २०१७ च्या महोत्सवात फारसे यश मिळाले नसलेतरी यंदा मात्र महाविद्यालयाने सर्व कलाप्रकारातून सहभाग नोंदवत यश खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. डान्स, एकांकिका, लघुनाटिका, मूकनाट्य, पथनाट्य आणि समूहगीतामध्ये हमखास यश मिळेल, अशी ग्वाही प्रा. राम पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास जागृत ठेवण्यासाठी प्रा.बबन गायकवाड, प्रा. संतोष कांबळे, शरद मेटकरी, आतिष बनसोडे, अभिजित भोसले, सागर काटे ही मंडळी परिश्रम घेत आहेत. शहरातील वालचंद, संगमेश्वर, दयानंद, वसुंधरा, छत्रपती शिवाजी सायं. महाविद्यालयाचे संघही जोरदार तयारीने महोत्सवात उतरुन आपली प्रतिष्ठा राखण्याच्या तयारीत गुंतले आहेत.
तालवाद्यावर ठेका!- शहर-जिल्ह्यातील महाविद्यालय परिसरातून फिरताना गेल्या महिनाभरापासून ढोलकी, तबला, पेटीचे मधुर स्वर कानी पडले लागले आहेत. मध्येच ताशाचा कडकडाटाने ताल धरत ठेका धरायला लावणारे सूरही कानी पडू लागले आहेत. महोत्सवाबद्दल सर्वच महाविद्यालयांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.