सोलापूर : राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीमध्ये सोलापूर झेडपीने सर्वच कामांच्या बाबतीत आॅनलाईन माहिती भरून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
ई-ग्राम सॉफ्टमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींपैकी १०२० ग्रामपंचायतीने माहिती भरली असून, जिल्ह्यातील ४२० ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. ई-ग्राम सॉफ्टमध्ये झेडपी राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. आर. टी. एस. म्हणजे सेवा हमी कायदा यामध्येही जिल्हा परिषदेने चांगले काम केले असून, राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे.
ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन यामध्येही राज्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने शंभर टक्के माहिती भरली असून, यामध्येही राज्यात प्रथम स्थानावर आहे. प्रिया सॉफ्टमध्येही जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने सप्टेंबर अखेर मंथ बुक क्लोज करून शंभर टक्के माहिती भरल्याने प्रिया सॉफ्टमध्ये ही जिल्हा परिषद राज्यात प्रथम स्थानावर सद्यस्थितीला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय गावरान जमिनीवर अतिक्रमण असलेल्या ३७ हजार २०२ नोंदींची माहिती भरून अतिक्रमण नियमानुकूल योजनेमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने शासनाकडे माहिती सादर केली आहे. यामध्येही सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम स्थानावर थांबली आहे. स्वच्छता व घरकूल योजना राबविण्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यात गौरव होत असतानाच आता ई-गव्हर्नन्स अंतर्गत योजनांची माहिती आॅनलाइन भरून जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर आली आहे, असे डॉ. भारूड यांनी सांगितले.