सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सावळा गोंधळ उघड झाला असून, गेल्या वर्षी डेंग्यू फैलावाच्या बंदोबस्तासाठी खरेदी करण्यात आलेले लाखो रुपयांचे साहित्य गोदामात धूळखात पडून असल्याचे दिसून आले आहे.
सन २०१९ मध्ये सप्टेंबर व आॅक्टोबरनंतर जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते. डेंग्यूच्या फैलावाबाबत पदाधिकाºयांमधून ओरड सुरू झाल्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आरोग्य विभागाला डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर यंत्रणा उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषध व डासांचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येणाºया यंत्रणेची खरेदी करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार २२ लाखांचे साहित्य व औषधे खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण डासांचा नायनाट करणारे यंत्र धूळखात पडून असल्याने आरोग्य यंत्रणेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
डेंग्यूच्या बंदोबस्तासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इंसेक्ट व डास रेपेलेंट (डास मारणारे) या इलेक्ट्रिक यंत्राची खरेदी करण्यात आली. हे यंत्र झेडपीच्या गोदामात ठेवण्यात आले, पण नंतर त्याचे वाटप करण्यात आलेच नाही. हे उपकरण कशासाठी घेतले व त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती जिल्हास्तरावरून कोणीही दिलेली नाही, असे येथील कर्मचाºयांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी दरमहा दहा आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोणत्या सुविधा आहेत. जिल्हास्तरावरून कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला. पुरेसा औषधसाठा आहे की नाही, याची खातरजमा करायची असते. पण त्यांच्या भेटीत या यंत्राविषयी विचारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे यंत्र कोणी व कशासाठी खरेदी केले आणि यावर नियंत्रण कोणाचे हे आजपर्यंत समजलेले नाही, अशी माहिती तेथील कर्मचाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. गोदामात या यंत्राचा साठा धूळखात पडून आहे.
वास्तविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी या गोदामाची तपासणी करून शिल्लक असलेल्या साठ्याबाबत संबंधीतांना जाब विचारणे गरजेचे होते. पण जमादार यांनी गोदामाची तपासणी केलीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
डास रेपेलेंट यंत्रासाठी सेस फंडातील तीन लाख खर्ची घातले आहेत. हे यंत्र खरेदी केल्यानंतर प्रत्येक आरोग्य केंद्र प्रमुखांना नेण्यास सांगितले होते, पण आणखीन बºयाच जणांनी यंत्र नेलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत डॉक्टरांकडे व्हॉट्सअॅपवरून पाठपुरावा सुरू आहे. - गजेंद्र कुमठेकर, साहित्य विभाग प्रमुख