सोलापूर : येथील सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची जाहीर झालेली निवडणूक आता ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. नियोजित निवड दहा दिवसांनी लांबणीवर गेल्याने आता अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी नागपूर अधिवेशनावेळीच जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितीतच होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २१ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र याबाबत ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी १० डिसेंबर रोजी पाठविलेल्या परिपत्रकानुसार २१ डिसेंबर रोजी घोषित केलेली निवड प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. झेडपी अध्यक्ष व सभापतींना २३ आॅगस्ट रोजी १२० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपत आहे.
या मुदतीनुसार निवडीचा कार्यक्रम घोषित केला होता. पण ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार मुदत संपल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती नोटीस काढून पदाधिकाºयांच्या निवडी घ्याव्यात असे नमूद केले आहे. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीबाबत दहा दिवसांची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार ही निवड ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार झेडपीच्या विशेष सभेचे नियोजन बदलण्यात आले आहे.
निवडणूक दहा दिवस पुढे गेल्याने झेडपीच्या पदाधिकाºयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पदाधिकारी निवडीसाठी सुरू असलेली धावपळ मंदावली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे शुक्रवारी होणारी बैठक झाली नाही; मात्र गुरुवारी आमदार प्रशांत परिचारक, झेडपीच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची अकलूजला जाऊन भेट घेतली. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी झेडपीतील बलाबल कसे आहे याची माहिती जाणून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्षाची बैठक बोलाविली असली तरी अद्याप काँग्रेस व सेनेच्या गोटात शांतता आहे.
भाजप-राष्ट्रवादी काठावर
- - झेडपीत सत्ता स्थापन करण्याबाबत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनंतर काँग्रेस व सेना यांच्या मदतीवर सत्ता काबीज होईल अशी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे; मात्र जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आघाड्यांचे चित्र बदलले आहे.
- - राष्ट्रवादीतील नेते सेना व भाजपमध्ये गेल्यामुळे कोण कोणाच्या पाठीशी राहणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीला ३५ आकडा गाठताना काठावर रहावे लागत आहे. दोघांची बेरीज २८ ते ३0 पर्यंत जात असल्याने सोबत कोणाला घ्यायचे यावर कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी एक झाल्यास हा प्रश्नच उरणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, समविचारी आघाडी की आणखी तिसरा प्रयोग होणार हे नागपूर अधिवेशनास्थळीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.