सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पंढरपूर तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या इयत्तेतील मुले चक्क टॅबवर अभ्यास करतात, हे पाहून जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी जणू प्रकट मुलाखत घेतल्याचा भासच उपस्थितांना यावेळी झाला.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी चिंचणीला भेट देऊन शाळेची आणि गावाची पाहणी केली. यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटी दरम्यान शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, मुलांचे इंग्रजीसह विविध विषयातील वाचन पाहून सीईओ मनीषा आव्हाळे भारावल्या. इतर जि. प. शाळांसाठी आदर्श ठरणाऱ्या चिंचणी जि. प. शाळेने केलेले काम सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रवासातील मैलाचा दगड ठरले आहे. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शाळेने केलेले विशेष प्रयत्न ठळकपणे दिसून येतात, असेही त्यांनी सांगितले.
चिंचणी जि. प. शाळेने शाळेच्या आवारात तयार केलेल्या परसबाग, ऑक्सिजन पार्क, औषधी वनस्पती, ग्रंथालय आदींचीही पाहणी आव्हाळे यांनी याप्रसंगी केली.
चिंचणी गावातील अभ्यासिका, विश्रामगृह, वरदायिनी माता मंदिर, जुन्या वस्तूंचे संग्रहालय, भोजनगृह, स्मशानभूमी आदी स्थळांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मोहन अनपट व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. चिंचणी गावाच्या विकासामध्ये कायम मदत करण्याचे आश्वासनही सीईओ आव्हाळे यांनी यावेळी दिले.