सोलापूर : नवीन वर्षात झेडपीत सत्तांतर करण्याची तयारी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोमवारी येथे बोलताना केली. त्यामुळे झेडपी अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याविरूद्ध अविश्वास येणार याच्यावर आत्ता शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाचे सदस्य आणि काँग्रेस, सेनेच्या सदस्यांच्या घुमजावमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली होती. भाजप पुरस्कृत परिवर्तन आघाडीचे व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अनिरूद्ध कांबळे अध्यक्ष तर आवताडे गटाचे दिलीप चव्हाण उपाध्यक्ष झाले. विषय समितीच्या निवडणुकीत अर्थ व बांधकाम सभापतीपद वगळता इतर तीन समित्यांवर विकास आघाडीतील उमेदवारांची वर्णी लागली. पण सत्तेतील महत्वाची तीन पदे भाजपपुरस्कृत आघाडीकडे गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्षनेतेपदाच्या बाकावर बसावे लागले आहे. बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत तक्रार करण्यात आली आहे, पण यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
आता राज्यातील सत्ता समीकरणामुळे झेडपीतील राजकारण बदलले आहे. गेल्या आठवड्यापासून अध्यक्षाविरूद्ध अविश्वास आणणार अशी चर्चा सुरू झाली होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यावर खळबळ उडाली आहे. पण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अविश्वासाबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. पण सोमवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील जिल्हा परिषदेत आले होते. त्यांना याबाबत विचारल्यावर दोन महिन्यात अश्विासाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, विद्यमान पदाधिक़ºयांकडून सदस्यांचे एकही काम झालेले नाही. विषय समितीत कामे मार्गी लागली जात नाहीत. या नाराजीचा फायदा घेत पुन्हा सत्ता काबीज करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणीच बोलले नाही झेडपी अध्यक्षांवर अश्विास येणार ही ‘लोकमत’मधील बातमी वाचून आघाडीतील सर्वांशी संपर्क साधला. पण यावर कोणीच बोलले नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी पक्षनेते आनंद तानवडे यांनी व्यक्त केली.