सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या सांडपाणी व्यवस्थापनातील शोषखड्डे अभियान देशपातळीवर राबविले जाईल, अशी माहिती केंद्रीय पेयजेल विभागाचे प्रधान सचिव परम अय्यर यांनी शुक्रवारी चेन्नई येथील कार्यशाळेत दिली.
केंद्रीय पेयजल विभागातर्फे शुक्रवारी चेन्नई येथील आयआयटीमध्ये राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला केंद्रीय पेयजल सचिव अय्यर यांच्यासह जागतिक बँक, युनिसेफ व इतर देशांतील संशोधक आणि देशातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेत विविध विभागात राबविलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनाही या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोलापूर जिल्ह्यात राबविलेल्या शोषखड्डेयुक्त ग्राम अभियानाचे सादरीकरण केले. मॅजिक पिटच्या माध्यमातून कमी खर्चात गावे गटारमुक्त करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन कसे केले, याचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. गावे गटारमुक्त करण्याच्या या अभियानाने दुर्गंधी व डासमुक्ती झाल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहणार आहे.
लोकसहभागातून जिल्ह्यातील २०० गावात ही कामे कशी झाली हे दाखविल्यावर उपस्थितांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवून या उपक्रमास दाद दिली. या उपक्रमाचा देशपातळीवर गौरव झाल्याबद्दल डॉ. भारूड यांनी समाधान व्यक्त केले.
वंडरफुल मॉडेल - केंद्रीय प्रधान सचिव अय्यर यांनी वंडरफुल मॉडेल अशा शब्दात शोषखड्डे अभियानाचे कौतुक केले. शासनाचे पाठबळ नसताना एक पाऊल पुढे जाऊन ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन उंचावण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे. स्वच्छता मंत्रालय देशपातळीवर मॉडेल म्हणून हा प्रयोग राबवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.