सोलापूर: पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये श्रमदान आणि लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहिली. आता जिल्हा परिषदेने प्रत्येक गावात पाच वनराई बंधारे बांधून नवी जलसंधारण चळवळ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २ ते १० आॅक्टोबर या कालावधीत श्रमदान आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाºया या मोहिमेसाठी सरपंच, ग्रामसेवकांनी काम सुरू करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. या मोहिमेत सर्वाेत्तम काम करणाºया गावांचा गौरवही होणार आहे.
झेडपी अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पाणी अडविण्यासाठी मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, साठवण प्रकल्प, पाझर तलाव, गाव तलाव, सिमेंट बंधारे झाले आहेत. तरी देखील पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाते. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासते. वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे हा चांगला पर्याय ठरला आहे. झेडपीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी मोहीम आखली आहे. २ आॅक्टोबर रोजी वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ होणार आहे. ज्या गावांमध्ये ५ पेक्षा जादा वनराई बंधारे बांधण्यात येतील, अशा ग्रामपंचायतींना आणि पंचायत समित्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मॉडेल बंधारे बांधून घेणारवनराई बंधारे मोहीम २ आॅक्टोबरपासून सुरू होणार असली तरी तत्पूर्वी २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये मॉडेल म्हणून एक वनराई बंधारा बांधून घेतला जाणार आहे. या बंधाºयांची माहिती, ठिकाण आणि फोटो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे सादर केले जाणार आहेत. लघु पाटबंधारेच्या उपविभागांनी या कामात मदत करावी, असे आदेशही लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी दिले आहेत.
पोती आताच जमवून ठेवा- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सरपंच, ग्रामसेवकांना पत्र जारी केले आहे. ज्या ठिकाणी वनराई बंधारे बांधावयाचे आहेत त्या जागेची निवड करून ठेवा. प्रत्येक बंधाºयासाठी १०० ते १५० रिकामी पोती लागणार असल्याने प्रत्येक गावासाठी ५०० ते ७५० एवढी रिकामी पोती २५ सप्टेंबरपर्यंत जमा करुन ग्रामपंचायत कार्यालयात ठेवावी. इतर साहित्यही जमा करुन ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाचा एक रुपया निधी न घेता श्रमदान आणि लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, ग्रामस्थांचा सहभाग घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या बळीराजासाठी, ग्रामस्थांसाठी सर्व जण हे पुण्याईचे काम करतील, अशी आशा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आतापासून नियोजन केले तरच ही मोहीम यशस्वी होणार आहे. - डॉ. राजेंद्र भारूड, सीईओ.