सोलापूर : फराळाच्या खमण पदार्थांबरोबर मिठाईची गोडी काही न्यारीच. दिवाळीतील पूजेसाठी प्रसाद म्हणून पेढा आवश्यक असतो; पण याशिवाय फराळ आणि मिष्ठान्न भोजनासाठी गुलाब जामून आणि अन्य मिठाईचे पदार्थ करण्यासाठी खवा वापरला जातो. त्यामुळे एरवी दररोज पाचशे - सातशे किलो होणारी खव्याची आवक दिवाळीच्या आधी दहा दिवस आणि आणि या सणाच्या पाच दिवसांमध्ये दहा हजार किलोपर्यंत जाते, अशी माहिती बाजारपेठेतून देण्यात आली.
सोलापुरात तांदुळवाडी, शिरापूर, लांबोटी, वडापूर , कुंथलगिरी, बार्शी आदी गावांतून खवा विक्रीसाठी येत असतो. शहरात लहान आणि मोठे मिळून ३० ते ३५ खवा विक्रेते आहेत. गाई आणि म्हशीच्या दुधाचा वापर करून खवा तयार केला जातो. साधारणत: १० किलो खवा तयार करण्यासाठी ६० लिटर दूध लागते, अशी माहिती व्यापाºयांनी दिली.
खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, गुलकंद, कुंदा असे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. शहरात १८० ते २४० रुपये किलो दराने खव्याची विक्री आहेत. काही मोठे व्यापारी मात्र खवा स्वत: तयार करुन विकतात. खवा तयार करण्यासाठी काही व्यापारी गाई आणि म्हशीचे दूध एकत्र करुन खवा तयार करतात. त्यामुळे खव्याची गुणवत्ता वाढते, असेही सांगण्यात आले.
भेसळ विक्रेत्यांवर कारवाई
- - दिवाळीच्या अनुषंगाने खव्याची मागणी जास्त असल्याने उलाढाल वाढते. त्यामुळे भेसळीची शक्यता नाकारता येत नाही.अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपूर्वी शहर आणि जिल्ह्यात छापे मारुन खवा जप्त केल्याचे अन्न व औषध प्रशासन उपायुक्त पांडुरंग राऊत यांनी सांगितले.
खव्याची अशी होते परीक्षा- खवा चांगला आहे की भेसळ याची तपासणी करण्यासाठी आयोडिनचा वापर करण्यात येतो. खव्यात आयोडिन टाकले तर खवा काळा पडला की समजायचे खव्यात भेसळ आहे.