अमित सोमवंशी
सोलापूर : दिवाळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. गतवर्षीच्या तुलनेत फराळ बनविण्यासाठी लागणारा किराणा १० ते १५ टक्क्यांनी महागला आहे. पण महागाईला झुगारून सोलापूरकर खरेदीसाठी बाहेर पडत असून, किराणा वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे खाद्य तेल १०० रूपये प्रति किलो इतके महागले आहे. तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी वाढल्या आहेत. साखर ३३ रुपये किलोने खरेदी करावी लागत आहे. गतवर्षी वनस्पती तूप ६० ते ६५ रुपये किलो होते. यंदा ७० ते ७५ रुपये आहे.
तेल, तूप आणि वनस्पती तूप यांच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक तयार फराळ विकत घेताना दिसत आहेत. तयार फराळाच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी महागल्या आहेत. दिवाळीच्या फराळाकरिता लागणाºया डाळी, साखर, गूळ आदी किराणा मालांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. दिवाळीत लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शंकरपाळे यासारखे तूप-तेलात तळलेले पौष्टिक पदार्थ करण्याची परंपरा आहे. आजही ती कायम आहे.
किराणा दुकानात काही वस्तू महाग मिळत असल्याने नागरिक आता मॉलमध्ये जाऊन खरेदी करत आहेत. मॉलमध्ये स्वस्तात किराणा मिळू लागल्याने यंदा नागरिक खरेदीसाठी मॉलकडे वळू लागले आहेत, असेही सांगण्यात आले.
दोन दिवसांनी खरेदी आणखी वाढेल...- दिवाळी काही दिवसांवर आली आहे. किराणा दुकानात खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. येत्या दोन दिवसांत साहित्य खरेदी करण्यासाठी आणखी ग्राहक येतील, असे किराणा दुकानदार गिरीश ख्याडे यांनी सांगितले. दिवाळी आठवड्यात येत आहे़ नागरिकांजवळ पैसा नाही, बाजारात भाव वाढलेले आहेत. तरीही खरेदीचा जोर कमी झाला नसून, आगामी काळात खरेदी वाढेल, असे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.