रवींद्र देशमुख
सोलापूर : असं म्हणतात की, प्रत्येक पन्नास - साठ किलोमीटर अंतरावर भाषेचा हेल अन् बोलण्याची शैली बदलते. आपण अनेकांनी हे अनुभवलंही आहे; पण आमची सोलापुरी मराठी मात्र न्यारी इथं गल्लीगणिक भाषा बदलते. भाषेला लाभलेला हेलकारी साज अन् रांगडेपणा मात्र कायम असतो. भाषेचा स्वरही टिपेलाच पोहोचलेला. आता हेच पाहा ना! ‘शांत बसा, उगीच वाद होईल’ असं जर बोलायचं असेल तर पक्का सोलापुरी म्हणेल, ‘शांतीला घे बेऽऽऽ, उगऽऽच राडा व्हईलऽऽ!’...
आपण सारेजणच माय मराठीचा गौरव करण्यासाठी रविवारी मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी चळवळ करत आहोत. मराठी जितकी प्राचीन आहे, तितकीच आधुनिकही आहे. शिवाय अन्य भाषेच्या शैलीला अन् शब्दांना मराठीनं सामावून घेतलं आहे. इतर भाषा भगिनींनीही मराठी शब्दांचा वापर केलेला आहे. सोलापूर हे तर बहुभाषिकांचं शहर. मराठी, कन्नड, तेलुगू अन् उर्दू बोलणाऱ्यांचं हे शहर; पण मराठीही सार्वत्रिकपणे बोलली जाणारी भाषा. या सोलापुरी मराठीनं कन्नड अन् तेलुगू भाषेचा हेल घेतला आहे. त्यामुळे ती हेलकारी झालीय. तर अन्य भाषेतून काही शब्द घेतले अन् त्या बोलीभाषांनाही मराठी शब्द दिले आहेत.
---
बेऽऽ
हिंदी भाषेत अनादराने ‘रे’ म्हणून वापरला जाणारा हा ‘बेऽऽ’ सोलापुरी मराठीतील प्रेमाचा शब्द आहे. ‘कसा हायस बे’, ‘तसं करू नकु बेऽऽ’, ‘काय करतो बे’ हे सामान्यत: सोलापुरी मराठीच्या संवादातील नमनाचे वाक्य. जो सोलापूरकर ‘बे’चा वापर करत नाही, तो आपल्या आतल्या गोटातील नाही, हे अगदी पक्की समजलं जातं.
----
‘आव’ प्रत्यय अन् हेल
जेवलांवऽऽ, बसलांवऽऽ, करतांवऽऽ.. असं क्रियापदाला ‘आव’ लावून हेल काढत बोलणारा जर तुम्हाला पुण्या - मुंबईत कोणी भेटला तर नक्की समजा, हा सोलापूरकर आहे. सोलापुरी मराठीच्या संवादातील हे शब्द उच्चारताना जेव्हा एखादा त्रयस्थ ऐकतो, तेव्हा त्याला विचित्र वाटत असेलही; पण या विचारण्यात प्रेमही पाझरत असल्याचं ध्यानात येतं.
-----
‘भ’ ला ‘ब’, अन् ‘फ’ ला ‘प’
तेलुगू भाषिक जेव्हा मराठी बोलतात तेव्हा काही मराठी शब्दांना ते ‘ब’, ‘प’ तसेच ‘क’ हे आद्याक्षर वापरतात. जेवताना जर एखाद्या तेलुगू भाषिकाला विचारायचं असेल, ‘भात घेतोस का?’ तर तो म्हणेल ‘बात घेतोऽऽ?’ असंच फाईल म्हणायंच असेल तर पाईल म्हणेल किंवा खाल्लंस का? विचारायचं असेल तर ‘काल्ल का?’ असं बोलेल. तेलुगू भाषिकाचं हे असं मराठी बोलणं कोणत्याच सोलापूरकराला वेगळं वाटत नाही.
-----
कायकू, मेरेकू...
आता सोलापूरकर जेव्हा हिंदी बोलतात विशेषत: विजापूरवेस, बेगमपेठ परिसरातील शहरवासीयाला ‘क्यू’ म्हणायंच असेल तर तो ‘कायकू’ म्हणेेल. ‘मुझे’ या शब्दासाठी ‘मेरेकू’ या शब्दाचा वापर करेेल तर तसेच ‘तुमको’ म्हणायचं असेल तर ‘तुमना’ म्हटलं जाईल.
----
कन्नडमधील मराठी शब्द
सोलापुरात पूर्वी मसरे गल्ली, बाळीवेस, उत्तर कसबा आदी भागात बहुतांश कन्नड भाषिक राहायचे. आता शहरातील सर्वच भागात कन्नड बोलणारे लोक आहेत. या कन्नडमध्ये मराठी भाषेचा वापर होतो. जसं की, ‘येनू विशेष?’ ‘नमस्कार री’च्या ऐवजी ‘नमस्कार ओऽऽ’ असा वापर केेला जातो.