संताजी शिंदे
सोलापूर : जुनी मिलच्या कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पापय्या तालमीला १०० वर्षांचा इतिहास असून, आजही अनेक पैलवान या मातीत तयार होत आहेत.
मुरारजी पेठ येथे सुपर मार्केट रोडसमोर जुनी मिल आवारात एक जुनी दगडी इमारत (तालीम) गेल्या १०० वर्षांपासून ताठमानेने उभी आहे. रोज सकाळी, संध्याकाळी या इमारतीतून शड्डूचे आवाज घुमतात. मिल मालक कै. नरोत्तमदास गोकुळदास मुरारजी हे कामगारांच्या हिताकडे लक्ष देणारे, कामगारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, कामाबरोबर शरीर सुदृढ व निरोगी असावे, या उदात्त हेतूने १९१६ साली सोलापूर कापड गिरणीत मिल मालकांनी कामगारांसाठी तालीम बांधली. तालमीमध्ये हैदराबादचे एक देशविख्यात सर्कसपटू व वस्ताद पापय्या सर्जनकर यांना तालमीचे वस्ताद म्हणून म्हणून नियुक्त करण्यात आले. तालमीचा सर्व खर्च गिरणी मालक सोसायचे, पण व्यवस्था पापय्याकडे असायची. तालमीतर्फे आंतरगिरणी स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. पूर्वी आंतरगिरणी कुस्ती स्पर्धा मुंबई, सुरत, अहमदाबाद, बडोदा येथे होत असत.
तालमीतून हजारो तरुण शारीरिक शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. पापय्या तालमीत शरीरसौष्ठव प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी उपकरणे आहेत. व्हॉलिबॉल कोर्ट आहे. दरवर्षी या ठिकाणी कुस्ती, व्हॉलिबॉल, कबड्डी, शरीरसौष्ठव व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. हनुमान जयंती उत्साहात साजरी होते. १९५७ सालापासून आजतागायत चंद्रकांत कदम पैलवान वस्ताद म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना जिममध्ये जाणे परवडत नसल्याने पैलवान चंद्रकांत कदम यांनी माफक दरात व्यायामाची संधी दिली.
तालमीत तयार झालेले मल्ल...- पापय्या तालमीत पैलवान चंद्रकांत कदम, कोंडीबा कादे, विठ्ठल सुरवसे, नागनाथ पानकोळी, भगवान पाटोळे, सुखदेव अंधारे, मारुती खोबरे-अणदूर, सिद्राम जाधव-केकाडी, गणपत वाघमारे-तरटगाव, ज्ञानोबा कराळे-सरकोली, बाबू भोसले, शिवाजी माळगे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, सुरेश यादव, अशोक कोरके, उस्मान शेख, वसंत कुलकर्णी, भैरू गायकवाड, बळीराम माने, श्रीमंत जाधव (हामू) पैलवान, नंदू उघडे, दत्ता भोसले, शिवाजी काशिद, प्रभाकर पवार, रमेश व्हटकर, अमर पुदाले, राजन जाधव, अरुण रोडगे, बाळासाहेब पुणेकर आदी मल्ल तयार झाले आहेत. राज्यपातळीवरील कुस्तीगीर परिषद विजेते कै. गोविंद नायकवाडी, कै. अल्लाउद्दीन मुल्ला, श्रीमंत जाधव (हामू पैलवान) यांनी तालमीचा नावलौकिक केला आहे. अनेक मल्ल दिवंगत झाले आहेत.
तालमीचे २०० सभासद...- तालमीत व्यायामासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी २०० च्या आसपास तरुण येतात. तालमीत कुस्ती, खड्डा मारणे, नांगर मारणे, रस्सी चढणे, डबल बार, सिंगल बार, शरीरसौष्ठवासाठी लागणारे साहित्य आहे.