रवींद्र देशमुख सोलापूर: स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२ साली स्थापन झालेल्या श्रद्धानंद तालमीचा सोलापुरात मोठा लौकिक आहे. नामवंत मल्लांना घडविणारी ही तालीम आज हाकेच्या अंतरावरील एक आणि भोवताली असलेल्या दोन जिम्सशी स्पर्धा करत तरुणाईला बलोपासना करण्यासाठी साद घालत आहे. साधारण आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील युवकांचा त्याला प्रतिसादही मिळत आहे; पण आता कुणीही कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेत नाही.
स्वातंत्र्य लढ्यात आपले जीवन लोटून देणारे स्वातंत्र्यसेनानी सिद्रामप्पा फुलारी यांनी आपल्या सहकाºयांसह हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या प्रेरणेने श्रद्धानंद तालीमची स्थापना केली. एका धर्मांध माथेफिरूने स्वामी श्रद्धानंद यांची हत्या केल्यानंतर १८ डिसेंबर १९२६ रोजी सोलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्वातंत्र्यसेनानी फुलारी आणि रेवणसिद्ध खराडे यांनी आपल्या सहकाºयांना एकत्र करून त्यावेळी सोलापुरात श्रद्धानंद समाजाची स्थापना केली. फुलारी हे कुस्तीशौकीन आणि त्या काळातील नामवंत कुस्तीपटू होते. सोलापुरात पहिलवानकीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने श्रद्धानंद तालीमची स्थापना झाली.
पैलवान रामभाऊ नायडू यांच्यासारख्या मल्लांपासून अनेक मल्ल या तालमीने दिले. या तालमीच्या मल्लांनी शहर, जिल्हा आणि राज्यात नामवंत असलेल्या अनेक मल्लांना अस्मान दाखवत आपल्या श्रद्धानंद तालमीचे नाव मोठे केले. आजही तालमीत मोठ्या उत्साहाने बलोपासना केली जाते; पण कुस्तीगिरी पूर्णत: बंद आहे. श्रद्धानंद तालीमला आता जिम्सशी स्पर्धा करावी लागत आहे. वस्तुत: तालीम व्यावसायिक नाही. तिथे कुणाकडूनही शुल्क आकारले जात नाही; पण तरुणाईचा ओढा आता अत्याधुनिक जिम्सकडे आहे.
यासंदर्भात श्रद्धानंद समाजाचे योगेश फुलारी म्हणाले की, आमच्या तालमीत गरीब, साधारण आर्थिक स्थिती असलेल्या घरातील मुले येतात. त्यांनाही व्यायामासाठी जिमप्रमाणे अवजारे मिळावेत म्हणून आम्ही पुलीज्, डंबेल्स आणि अन्य साहित्य आणून ठेवले आहे. मुले तालीम आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने व्यायाम करतात. श्रद्धानंद तालमीमध्ये सध्या सुरेश राऊत हे कुस्तीचे प्रशिक्षण देतात. शिवाय, जुन्या काळातील मल्ल आवर्जून येऊन तरुण पैलवानांना कुस्तीचे डाव शिकवितात. हल्ली या तालमीतील कुणाचाही कुस्ती स्पर्धेत भाग घेण्याचा कल नाही. कारण, कुस्तीसाठी आवश्यक असणारा खुराक मुलांना परवडत नाही. शिवाय, सध्या मॅटवरच्या कुस्त्या सर्वाधिक प्रमाणात होतात. त्यामुळे मातीत तयार होणारे पैलवान त्या कुस्त्यांकडे वळत नाहीत... योगेश फुलारी यांनी सांगितले.
लाल माती ही ७६ वर्षांची!- श्रद्धानंद तालमीत सोळा बाय सोळा फुटांचा हौदा आहे. स्थापनेच्या काळापासूनची लाल माती या हौद्यात आहे. या मातीची जोपासना अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. आठवड्याला या मातीमध्ये ४० ते ५० लिटर ताक शिंपडले जाते. याशिवाय मातीचा चिकटपणा कायम राहावा आणि ती जिवंत राहावी, यासाठी ३०-४० किलो हळद, पोतंभर काव, तुपाची बेरीही यामध्ये मिसळली जाते. पारंपरिक पद्धतीने ज्या तालमी राखण्यात आल्या आहेत, त्यामध्ये अशाच पद्धतीने मातीची जोपासना होते; मात्र प्रमाण हौद्याच्या आकारानुसार बदलते.
यांनी गाजविला आखाडा- श्रद्धानंद तालमीतील पैलवान रामभाऊ नायडू, बाबुशा फुलारी, अंबादास, दयानंद पुकाळे, अंदप्पा हक्के, विठ्ठल काटकर, सुभाष सुतार-धोत्रीकर, धोंडीराम बिराजदार (कुंभारी), तुळशीदास गोंधळी, इरप्पा मेंडके, दत्तुसा कणगिरी, राजू इनामदार आणि पैलवान शफी यांनी अनेक कुस्त्या जिंकून श्रद्धानंद तालमीचा लौकिक वाढविला.