अमित सोमवंशी । सोलापूर : तुळजापूर वेशीमधील गोल तालमीत आजही ४० लहान-मोठे मल्ल सराव करतात. जिमसाठी लागणारे आधुनिक साहित्यही या तालमीत असल्यामुळे तरुण पिढीला व्यायाम आणि कसरतीची गोडी लावण्याचे काम अखंडपणे याठिकाणी करण्यात येत आहे.या तालमीला हिंदकेसरी विजेत्यांसह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. गरिबांच्या मुलांना पूर्णपणे मोफत तालमीचे शिक्षण देण्यात येत असून, कुस्त्यांचा फड खेळणारी काही मुले परदेशात असल्याचे सांगण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात भीमराव सलगर, हांडे, देवकर आणि पिपरे यांनी आपल्या सहकाºयांसह मिळून तालमीची स्थापना केली आहे. या तालमीला आजपर्यंत अनेक दिग्गज पैलवानांनी भेटी दिल्या आहेत. या तालमीच्या मल्लांनी शहर-जिल्ह्याबरोबरच राज्यपातळीवर कुस्त्या जिंकल्या आहेत.
गरीब, साधारण, आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्यांची मुले येथे कसरत करण्यासाठी येतात. त्यांना आजही व्यायामासाठी लागणारे जिमप्रमाणे साहित्य येथे आणून ठेवले आहे. या तालमीत आधी कासेगाव, कोल्हापूर, पंढरपूर, अकलूज येथील मल्ल शिकण्यासाठी येत असे. तुळजापूर वेशीमध्ये सध्या फक्त गोल तालीम चालू आहे.
ही ब्रिटिश काळातील तालीम असून, हिंदकेसरी विजेते आप्पालाल शेख हे गोल तालमीमध्ये कुस्ती खेळून गेले आहेत. या तालमीत आजही ४० लहान मल्ल दररोज येऊन सराव करतात़ त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शरीरसौष्ठव प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी उपकरणे आहेत. दिल्ली येथे २०१४ मध्ये झालेल्या महाविद्यालयीन कुस्तीच्या स्पर्धेत येथील मल्लांनी सहभाग नोंदविला होता. काही मुले प्राथमिक स्तरावर कुस्ती खेळत आहेत. सगळ्यांसाठी खुली असलेल्या या तालमीतील कुस्तीचा फड हा गोल असल्याने या तालमीला गोल तालीम असे नाव पडले.
च्गोल तालमीचे बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. जागा अपुरी पडत आहे. तालमीच्या नवीन बांधकामासाठी अनेकांकडे मदतीची मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत कोणी मदत केली नसल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या युगात जिममुळे तालमीकडे दुर्लक्ष होत आहे. तालमीत व्यायाम करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी १५० च्या आसपास तरुण येतात. कुस्ती, खड्डा मारणे, डबल बार, सिंगल बार, शरीरसौष्ठवसाठी लागणारे साहित्य येथे उपलब्ध आहे.
मातीवर दीड लाख खर्च- येथे लहान मुलांना कुस्तीचे ज्ञान देऊन त्यांना भविष्यात चांगले कुस्तीपटू करण्याचे काम या तालमीमध्ये केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील मल्लांना येथे राहण्यासाठी सोय केली आहे. मोफत प्रशिक्षण दिले जाते. गोल तालमीमध्ये मोलमजुरी करणाºयांची मुले कुस्ती खेळण्यासाठी येतात. मातीची जोपासना काळजीपूर्वक केली जाते. मातीत लिंबू, काव, हळद, ताक, घाणीचे तेल टाकले जाते.