सोलापूर : स्थानिक बाजारपेठेपेक्षा प्रति बॉक्सला १५ ते २० टक्के अधिक दर, वाहतूक खर्चात २० ते २५ टक्के भाडे कमी, कमी वेळेत जास्त मालाची वाहतूक, चोरी, मालाचे नुकसान होत नसल्याने किसान रेलला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सांगोला परिसरातील सिमला मिरचीला बिहार, दिल्ली, मुंबईमधील हॉटेल्स, मॉल व अन्य बाजारपेठेत मागणी जास्त आहे़ किसान रेलच्या माध्यमातून दोन फेºयात तब्बल २०६ टन सिमला मिरची, डाळिंबासह अन्य शेतमाल बिहारमधील बाजारपेठेत पोहोचला आहे़ दरम्यान, शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल जलद व कमी खर्चात अन्य राज्यांत पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे विभागात किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार पहिली किसान रेल २१ आॅगस्ट रोजी सांगोला रेल्वे स्थानकावरून धावली़ त्यानंतर दुसरी रेल्वे २५ आॅगस्ट रोजी धावली. दहा डबे असलेली रेल्वेगाडी सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूरमार्गे बिहार (मुजफ्फरपूर) रेल्वे स्थानकांवर पोहोचते़ मागील दोन फेºयांत दौंड, बेलापूर, कोपरगाव येथीलही शेतमाल बिहारकडे रवाना झाला आहे.
आठवड्यातून दोन दिवस धावणार ट्रेनवाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने किसान रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे़ सांगोला-मनमाड-दौंड ही रेल्वेगाडी मुजफ्फरपूर स्थानकापर्यंत जाणार आहे. प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ऐवजी सांगोला येथून सकाळी ८ वाजता सुटणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६़३० वाजता मनमाडला पोहोचेल़ रात्री ८ वाजता मनमाडहून सुटेल आणि दुसºया दिवशी रात्री एकच्या सुमारास दौंडला पोहोचेल. दौंडनंतर अहमदनगर आणि बेलापूरला जाईल. त्यानंतर ती पुढे मुजफ्फरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे़
असे मिळतात शेतमालाचे पैसे...सांगोला परिसरातील शेतमालाची विक्री शेताच्या बांधावरच होते़ दलालामार्फत मालाच्या दर्जानुसार किंमत ठरते, त्यानुसार दलालाकडून रोख स्वरूपात शेतकºयांना जागेवरच पैसे दिले जातात. दलाल हा सगळा माल स्वत:च्या जबाबदारीवर शेतातून थेट दिल्ली, बिहार व अन्य राज्यांतील मार्केटमध्ये पोच करतो़ त्यामुळे शेतकºयांचा वाहतूक खर्च, मार्केटमधील विविध कराचे पैसे वाचले जातात़ रस्ते वाहतूक खर्चापेक्षा रेल्वेने प्रति टन १ ते २ हजार रुपये कमी भाडे, कमी वेळेत जास्त मालाची निर्यात, चोरी, अपघात, पाऊस व अन्य कारणांनी होणारे शेतमालाचे नुकसान होत नाही. वाहतुकीसाठी रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त यासह अन्य कारणांमुळे शेतमालाच्या रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीकडे अधिक आकर्षित होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़
किसान रेल्वेला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद पाहता ही रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतात पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी किसान रेल्वेची मदत घ्यावी़ रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक अगदी कमी दरात, जलद व सुरक्षित आहे़ - प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल अधिकारी, सोलापूर.