पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरकरांचे दातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:54 AM2018-08-22T11:54:04+5:302018-08-22T11:58:03+5:30
सर्वसामान्यांचेही योगदान : पश्चिम भागात जमा झाले २.६० लाख रुपये
सोलापूर : केरळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी सोलापूरकरांनी मोठे दातृत्व दाखवले. माकपतर्फे काढण्यात आलेल्या मदतफेरीला शहरातील छोटे-मोठे व्यापारी, फेरीवाले, पादचाºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २ लाख ६० हजार रुपये जमा झाले.
सकाळी ११ वाजता शहापूर चाळ येथील शहीद अब्दुल रसूल कुर्बान हुसेन गृहनिर्माण संस्था कार्यालयापासून मदतफेरीला सुरुवात करण्यात आली. किडवाई चौक येथे फेरी आल्यानंतर रस्त्यावरच्या व्यापाºयांनी दहा, वीस रुपये दिले. यानंतर बेगमपेठ येथे फेरी गेली. दुकान, हॉटेल व्यावसायिकांनी ५०-१०० रुपये मदत दिली. माणिक चौक, मंगळवार पेठ, चाटी गल्ली अशा सर्व ठिकाणी रस्त्यांवरील पादचाºयांनी यथाशक्ती निधी दिला. नवी पेठमधील फुलविक्रेत्यांनी पूरग्रस्तांसाठी निधी दिला. यानंतर मेकॅनिक चौकातून छत्रपती शिवाजी चौकात मोहिमेचा समारोप करण्यात आला.
यावेळी नागरिक, कामगार, विद्यार्थी, फेरीवाले, छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, शासकीय व प्रशासकीय वर्गाकडून उत्स्फूर्त मदत मिळाली. १० रु़पासून ते २ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मदत म्हणून सोलापूरकरांनी दिली.
दिवसभरात २ लाख ५९ हजार ९७४ रुपये निधी जमा झाला. नैसर्गिक संकटाचा सामना करणाºया केरळवासीयांसाठी सुरू असलेला मदतीचा ओघ पाहून घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती नरसय्या आडम यांनी दिली.
कपड्यांचे ५० जोड
- पिकअप टेलर्सचे विजय गुळेद यांनी ५० जोड नवीन कपड्यांची जोडी मदत म्हणून माकप कार्यालयात येऊन दिले. हे कपडे तत्काळ रेल्वेद्वारे केरळकडे पाठवण्यात आले.
विविध सामाजिक संघटनांनी अशा प्रकारची मदतफेरी काढावी. नवीपेठमधील सर्व व्यापारी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करतील. पूरग्रस्तांंना दिलासा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
- कैलास उपाध्ये, व्यापारी, नवीपेठ.
भूकंप, महापूर अशा अस्मानी संकटाच्या वेळी नेहमीच सर्व भारतीय एकत्र येतात. सोलापूरकर याला अपवाद नाहीत. पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत केली.
- डॉ. विश्वनाथ बिराजदार, पारस इस्टेट
नैसर्गिक संकट कुठेही आले तरी सर्वच जण मदत करीत असतात. किल्लारी आणि सास्तूरला भूकंप झाला असताना संपूर्ण जगाने मदत केली होती. अशीच मदत पूरग्रस्तांसाठी करीत आहोत.
- कैलास बंडगर, रिक्षाचालक