सोलापूर : आजपर्यंतच्या कालावधीत सोलापूरकर सध्याची आठवी संचारबंदी अनुभवत आहेत. पूर्वी लॉकअपमध्ये नेले जात होते, मात्र आता संचारबंदीमध्ये रस्त्यावरच कारवाई केली जात आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नव्हे तर कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात १९६७ साली धार्मिक वादातून दंगल उसळली होती. दंगलीमुळे त्यावेळी शहरातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. १९७२ साली अशाच पद्धतीचा धार्मिक वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये काही ठराविक भागात कर्फ्यू लावण्यात आला होता. १९७७ साली राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या कारणावरून सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यामुळे शहरात काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. १९८२ साली एका संघटनेच्या कार्यक्रमाच्या कारणावरून दगडफेक व दंगल झाली होती, त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
१९९२ साली देशपातळीवर धार्मिक मुद्दा उपस्थित झाल्यामुळे सोलापुरात १९९३ साली दंगल झाली होती. दंगलीला आटोक्यात आणण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सलग पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. २००२ साली जागतिक पातळीवर झालेल्या एका विधानामुळे सोलापुरात दंगल घडली होती. या दंगलीला रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करावी लागली होती. २००६ साली देखील दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल घडली होती. याही वेळी संचारबंदी लावण्यात आली होती. काही संचारबंदी दोन दिवसांसाठी, काही चार दिवसांसाठी तर काही आठ ते दहा दिवसांसाठी लागू करण्यात आली होती.
सध्या लावण्यात आलेली संचारबंदी ही आठवी असून ती आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कालावधीची आहे. पूर्वी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संचारबंदी लागू केली जात होती. यंदा मात्र जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दि. २३ मार्चपासून संचारबंदी लागू झाली होती. ही संचारबंदी जवळपास चाळीस दिवस चालली, त्यानंतर काही प्रमाणात सूट देत देत उठवण्यात आली होती.
समोरील व्यक्तीच्या जीवासाठी होणार कारवाई
- - पूर्वीच्या संचारबंदीमध्ये दगडफेक केली म्हणून चाकूहल्ला, तलवारहल्ला केला म्हणून दुसºयाच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून संबंधिताला लॉकअपमध्ये घालून कारवाई केली जात होती. आता जी व्यक्ती रस्त्यावर दिसेल त्याला त्याच्या जीवासाठीच पोलीस कारवाई करणार आहेत.
- - पूर्वीच्या संचारबंदीमध्ये दंगेखोरांना घरातून बाहेर काढून चोप दिला जात होता, आता घरात बसा बाहेर येऊ नका, असे सांगून चोप देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.