सोलापूर : मुंबई अन् पुण्यात झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे राहणीमान, जेवणाची व्यवस्था होत नसल्याच्या कारणाने मुंबई, पुण्यातील सोलापूरकर (ग्रामीण भागातील) लोक परतू लागल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी पुणे, मुंबईहून येताना सहजासहजी मिळणारे रेल्वेचे तिकिटाला आता वेटिंगचा बोर्ड ऑनलाइन दाखवित असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात वाढत्या कोरोनामुळे विविध शहरांनी कडक निर्बंध लादले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय मुंबई, पुण्यातील प्रशासनाने घेतला आहे. शिवाय कडक संचारबंदीही लागू केली आहे. अशा परिस्थितीत राहणीमान, जेवणाची पुन्हा अडचण होत असल्याने बहुतांश सोलापूरकर आपल्या मूळगावी परतू लागल्याचे सांगण्यात आले. विशेषत: ग्रामीण भागातील लोक जास्त प्रमाणात परतू लागल्याचे सांगण्यात आले. काही लोक खासगी चारचाकी गाड्यांसह बसेसचा आधार घेत आहेत.
-----------
कंपन्यांनी दिले पास...
जे पुणेरी सोलापूरकर पुण्यातील कंपनीत काम करतात, त्यांना लॉकडाऊन काळात अडचण येऊ म्हणून पासेस दिले आहेत. शिवाय शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था कंपनीच्यावतीने करण्यात येत आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कंपनीमार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही पुणेरी सोलापूरकरांनी अद्याप पुणे, मुंबई सोडणे पसंत केलेले नाही.
१०० ते १५० पर्यंत वेटिंग...
मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोरोना काळात विशेष गाड्या धावत आहेत. पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी दिवसातून चार ते पाच गाड्या आहेत. त्यापैकी बहुतांश गाड्यांचे तिकीट कन्फर्म मिळेनासे झाले आहे. साधारण १०० ते १२० पर्यंतचे वेटिंग दाखवित असल्याचे प्रवाशांनी सांगितले. शक्यतो पुण्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
सोलापूर सोडणारे कमीच...
लॉकडाऊनचा निर्णय सोलापुरातील प्रशासनाने घेतला आहे. हॉटेल, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बांधकाम कामगार, कारागीर, किरकोळ साहित्यांची विक्री करणारे परप्रांतीय अद्याप तरी सोलापूर सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. शहरातील सर्वकाही बंद असले तरी जीवनाश्यक वस्तू मिळणारी दुकाने सुरूच असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोलापूर सोडणारे अद्याप रेल्वेने प्रवास करतानाचे चित्र दिसत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.