सोलापूर : हनुमान नगर भवानी पेठ येथील बीएसएनएलच्या कार्यालयात दहा कर्मचाºयांना ओलीस ठेवलेल्या अतिरेक्याला शिताफीने अटक करण्यात आली. चकमकीत एकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले तर दुसºयाला ताब्यात घेतले. हा थरार होता हनुमान नगर येथील बीएसएनएल टॉवरच्या कार्यालयातील.
भवानी पेठ हनुमान नगर येथील ‘बीएसएनएल’ कार्यालयात सकाळच्या सुमारास अचानक दोन अतिरेकी घुसले होते. अतिरेक्याने कार्यालयातील दुसºया मजल्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना बंधक बनवून ओलीस ठेवले होते. ही बातमी पोलिसांना समजली, तत्काळ आयुक्तालयातील क्युआरटी हनुमान नगर येथे पोहोचले. बंदूकधारी ‘क्युआरटी’च्या जवानांनी ‘बीएसएनएल’ कार्यालयाला घेरले. आतील अतिरेक्यांशी संपर्क साधून त्यांची मागणी काय आहे याची विचारणा केली. एकीकडे अतिरेक्यांशी बोलणी चालू ठेवून पथकातील जवानांनी कार्यालयाचा ताबा घेतला. अतिरेक्यांशी सुरू असलेल्या बोलणीदरम्यान पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. अतिरेक्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू जवानांनी कार्यालयातील दुसरा मजला गाठला.
शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना शरण येण्यास सांगितले जात होते, मात्र अतिरेकी ऐकण्यास तयार नव्हते. दुसºया मजल्यावर गेलेल्या जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.
ओलिस धरलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना ठार मारण्याची धमकी दिली. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या दिशेने क्युआरटी पथकातील जवानांनी गोळीबार केला. झालेल्या चकमकीत एक अतिरेक्याला गोळी लागून जागेवर पडला. दुसºया अतिरेक्याने अंधाधुंद गोळीबार करीत असताना क्युआरटीच्या जवानांनी मोठ्या शिताफीने जीव धोक्यात घालून कार्यालयात प्रवेश केला.
कार्यालय ताब्यात घेतलेल्या जवानांनी बंदुकीचा धाक दाखवून शरण येण्यास सांगितले. एकाच वेळी १० ते १२ जवानांनी अतिरेक्याला घेराव घालून त्याच्यावर बंदूक रोखली. नाईलाज झालेल्या अतिरेक्याने बंदूक जमिनीवर टाकली आणि स्वत:ला अटक करून घेतली. अतिरेक्याला ताब्यात घेऊन दोन्ही हात बांधण्यात आले, त्याची बंदूक ताब्यात घेण्यात आली. अतिरेक्याला धरून खाली आणण्यात आले. गोळीबारात ठार झालेल्या अतिरेक्याला स्ट्रेचरवर घालून आणले.
कारवाईनंतर नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास...- अतिरेक्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाई दरम्यान पोलिसांची गर्दी आणि बंदूकधारी क्युआरटीचे जवान पाहून काय सुरू आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती. कारवाई पाहण्यासाठी न्यू बुधवार पेठ, रमाबाई आंबेडकर नगर, हनुमान नगर भागातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे व पोलीस कर्मचाºयांनी लोकांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. आतमध्ये अतिरेकी आहेत, अशी माहिती कळाल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली.
अतिरेकी इथपर्यंत कसे पोहोचले, ते टॉवरच्या जवळ बॉम्बस्फोट घडवणार होते का?. बॉम्बस्फोट झाला तर काय होईल असे एक न अनेक प्रश्न करीत होते. कारवाई संपल्यानंतरही एक रंगीत तालीम होती, हे जेव्हा लोकांना समजले तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाच्या गाड्यांनी भीतीचे वातावरण- क्युआरटीची कारवाई सुरू होती, अवघ्या काही वेळात घटनास्थळी सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स व अग्निशामक दलाच्या दोन गाड्या पोहोचल्या. पोलिसांचा ताफा, बंदूकधारी क्युआरटीचे जवान पाहून स्थानिक लोकांमध्ये प्रथमत: भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरात अशा पद्धतीने जर अतिरेक्यांनी काही गडबड केल्यास, त्याला प्रत्युत्तर देऊन स्थानिक लोकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील क्युआरटी पथक सज्ज आहे. शहरवासीयांनी नेहमी सतर्क आणि सावध राहिले पाहिजे, यासाठी पथकाची रंगीत तालीम बीएसएनएलचे टॉवर असलेल्या कार्यालयात घेण्यात आली. - संतोष काणेपोलीस निरीक्षक