सोलापूर : कोणतेही वाहन चालवताना तुम्ही जर वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर वेळीच सावध व्हा. तुमचा वाहन चालवण्याचा परवाना तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक पोलिसांकडून यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, वाहनधारकाने सातत्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास परवाना रद्द करण्यासाठी मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम १९ अन्वये चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा वाढता आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आता जनजागृती, प्रचार व प्रसारासाठी कंबर कसली आहे. वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले आहेत. त्यानुसार आता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
हे नियम मोडल्यास परवाना होणार रद्द ?
- वेग मर्यादेचा भंग करुन भरधाव पद्धतीने वाहन चालविणे
- लाल सिग्नल ओलांडून जाणे
- मालवाहतूक वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे.
- मालवाहतूक वाहनातून मानवी वाहतूक किंवा प्रवासी वाहतूक करणे
- दारु किंवा अंमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालविणे
- वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे
नियम भंग - एकूण कारवाई - एकूण दंड
विना हेल्मेट - १४८१३ - ७४ लाख ६ हजार ५००
विना सीटबेल्ट - २९३७४ - ५९ लाख १९ हजार ५००
वेगमर्यादेचे उल्लघंन - ९४७० - १ कोटी ८८ लाख ५८ हजार ५००
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे - २५४९ - २८ लाख ३१ हजार ५००
दारू पिऊन वाहन चालविणे - १८२ - ४६ हजार
ट्रीपलसीट वाहन चालविणे - ६६४३ - ६६ लाख ४३ हजार
अवैध प्रवासी वाहतूक - ८७ - १ लाख ८२ हजार ८००
विरूध्द दिशेने वाहने चालविणाऱ्यावर खटले
विरूध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने न्यायालयात खटले दाखल करण्यात येतात. मागील दहा महिन्यात १५ वाहनांविरोधात न्यायालयात खटले सादर करण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने दिली आहे.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पाेलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या सूचनेनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. दंड, परवाना निलंबित व खटलेही दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- महेश स्वामी, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.