सोलापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे बुधवारपासून सोलापूर जिल्ह्यात मास्क आणि गर्दीबाबत कडक अंमलबजावणी करणार आहेत. यापूर्वी जे नियम लागू होते ते सर्व नियम बुधवारपासून लागू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मास्क आणि गर्दीचे नियम मोडल्यास कडक दंडात्मक कारवाईचे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत.
यापूर्वी सोलापुरात कोरोनाची स्थिती भयावह होती. तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सतर्क झाले आहेत. प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाबाबत नियमावली लवकरच पुन्हा एकदा जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश आहेत. प्रत्येक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. होम आयसोलेशन बंद करण्यात आले असून, यापुढे रुग्णांना सेंटरमध्ये उपचार घ्यावा लागेल. हॉटेल व मंगल कार्यालये या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी संबंधित व्यवस्थापन दक्ष राहावे.
शहर, तसेच ग्रामीण भागातील छोट्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांचा तपशील रोजच्या रोज प्रशासनाला कळवावा. सर्दी, ताप, खोकला अशा रुग्णांची संख्यादेखील कळवावे. मिरवणुका, तसेच धार्मिक कार्यक्रमांवरदेखील बंदी राहील. अंत्यसंस्कारादरम्यान पूर्वीप्रमाणे फक्त वीस लोकांनाच परवानगी राहील.
मंगल कार्यालयाचा परवाना रद्द होईल
मंगल कार्यालयात उपस्थित नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. उपस्थित नागरिक विनामास्क आढळल्यास थेट मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई होईल, तसेच मंगल कार्यालयाचा परवानादेखील रद्द होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, मास्क न वापरणाऱ्या २ लाख २६ हजार नागरिकांकडून तीन कोटी ६९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत २९ हजार ८५९ लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. एकूण ४३ हजार पाचशे लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ७० टक्के लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाइनवर अकराशे लोकांना लस दिली होती. या अकराशे लोकांचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांना आता दुसरी लस देण्यात येत आहे. यातील २३० लोकांनी दुसरी लस घेतली आहे.