साेलापूर : शहरातील तीन नागरी आराेग्य केंद्रे वगळता इतर भागात कमी प्रमाणात लसीकरण झाले. महापालिकेची यंत्रणा घरापर्यंत जाऊन लस देण्याचे नियाेजन केले आहे. लस उपलब्ध असूनही लस न घेतलेल्या नागरिकांवर गुरुवारपासून कारवाई हाेईल, असा इशारा आराेग्य अधिकारी डाॅ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिला.
राज्य शासनाच्या मिशन कवचकुंडल अभियानासाठी महापालिकेच्या टास्क फाेर्सची बैठक मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत झाली. पालिकेच्या माध्यमातून ४५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मजरेवाडी नागरी आराेग्य केंद्राच्या भागात ९१ टक्के, देगाव ८४ टक्के, भावनाऋषी नागरी आरोग्य केंद्र ८० टक्के इतके लसीकरण झाले आहे. नई जिंदगी नागरी आराेग्य केंद्राच्या परिसरात केवळ २५ टक्के, दाराशा ३० टक्के, सिव्हील हाॅस्पिटल परिसर ३५ टक्के, जिजामाता नागरी आराेग्य केंद्र ४० टक्के लसीकरण झाले आहे. इतर भागातही लसीकरण झालेले नाही. इंडियन रेड क्राॅस साेसायटी व राेटरी क्लबची व्हॅन या भागात जाऊन माेफत लसीकरण करेल. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत हे लसीकरण हाेईल. यापुढील काळात पालिकेची यंत्रणा घराेघरी, कारखाने, दुकाने या ठिकाणी जाऊन लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी करेल, असेही या बैठकीत ठरले.
--
ज्या भागात कमी लसीकरण झाले त्या भागातील लाेकप्रतिनिधी व नगरसेवकांनी नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन जावे. लसीकरण कमी झालेल्या भागात महापालिकेची यंत्रणा तपासणी करणार आहे. लस उपलब्ध असूनही लस न घेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई हाेईल. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.