सोलापूर : यंदाच्या वर्षी सोलापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. विजापूर रोड परिसरातील वसंत नगरमधील नागरिकांनी यात सहभाग घेतला. त्यांनी आपल्याकडील २० मूर्ती मूर्तिकाराला देऊन पर्यावरणपूरक विसर्जन केले.
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शहरातील तलावात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे भाविकांनी पीओपीच्या (प्लॅस्टर आॅफ पॅरिस) मूर्ती न घेता शाडूच्या घेतल्या. अशा मूर्ती अधिक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने भाविकांना पीओपीच्या मूर्ती घ्याव्या लागल्या. अशा मूर्र्तींचे महापालिकेतर्फे विभागनिहाय संकलन करण्यात येत होते. या परिस्थितीचा विचार करून वसंत नगर येथील मित्रप्रेम तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडील मूर्ती महापालिकेकडे न देता पुन्हा मूर्तिकाराला देण्याचा विचार समोर आला.
ज्या नागरिकांनी शाडूची मूर्ती आणली त्यांनी घरीच विसर्जन केले, तर ज्यांनी पीओपीची मूर्ती आणली त्यांनी या विचाराला प्रतिसाद देत मूर्तिकाराला मूर्ती देणे मान्य केले. पाहता पाहता वसंत नगरमधून २० मूर्ती मित्रप्रेम तरुण मंडळात आणल्या गेल्या. सर्व मूर्र्तींची सामुदायिक आरती करण्यात आली. प्रसादाचे वाटप आणि गणपती बाप्पांचा गजर करण्यात आला. सोलापुरातील मूर्तिकार गोपाल दुस्सा यांनी या मूर्र्तींचे संकलन केले.
एका मेसेजवरून विचार उतरला प्रत्यक्षातवसंतनगरमधील नागरिक हे पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांचा प्रत्येक पर्यावरणपूरक उपक्रमात नेहमीच पुढाकार असतो. यंदाही फक्त एका व्हॉट्सअॅप मेसेजवरील आवाहनाला येथील नागरिकांनी प्रतिसाद देऊन हा आगळावेगळा उपक्रम राबविल्याचे राजू कलमाडी यांनी सांगितले.
वसंतनगर तसेच आणखी काही भागातून आम्ही गणेशमूर्ती घेतल्या आहेत. या मूर्तींची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पुढील वर्षी मूर्तीला रंग देऊन त्यावर कोरीव काम करून भाविकांना देण्याचे नियोजन आहे. तीन वर्षांपूर्वी सुमारे ५०० मूर्ती घेऊन त्या पुन्हा भाविकांना देण्यात आल्या होत्या. - गोपाल दुस्सा, मूर्तिकार.