सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडे कोरोनाची लस उपलब्ध नाही. लस आल्यानंतर माध्यमातून कळविले जाईल. त्यामुळे आता आरोग्य केंद्रावर गर्दी करू नका, असे आवाहन मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले.
आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची मोहीम गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पद्धतीने पालिकेने सर्व केंद्रावर नियोजन केले आहे. मात्र सध्या कोरोनाची लस पुरेशा प्रमाणात मिळत नाही. पालिकेने लसीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. ही लस उपलब्ध झाली की नागरिकांना कळविले जाईल. नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करूनच आरोग्य केंद्रात यायचे आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. ही नोंदणी झालेली असेल. लस उपलब्ध असेल तरच आरोग्य केंद्रावर यावे.
शहरात सोमवारपासून लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प आहे. लोक आरोग्य केंद्रामध्ये फेऱ्या मारून वैतागले आहेत. खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ही रुग्णालये वैतागली आहेत.