सोलापूर : शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना ६०० रूपये ब्रास वाळू मिळण्याची प्रतिक्षा संपली आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील जांभूड येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लवकरच वाळू विक्रीला सुरूवात होणार आहे.
वाळू व्यवसायातील माफीयांना आवर घालण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शासनाचे वाळू धोरण जाहीर केले होते. ५ एप्रिल २०२३ रोजी राज्याच्या मंत्रीमंडळात निर्णय झाला. १९ एप्रिल रोजी शासकीय अध्यायदेश काढण्यात आला. सोलापूरात जिल्हा खणी कर्म विभागाने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषानुसार भिमा नदीच्या पात्रात सहा ठिकाण निश्चित करण्यात आले होते. पावसाळ्यात गाळ होईल अशा ठिकाणी वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.
९ जून रोजी निविदा उघडण्यात आल्या मात्र त्यात चळे (ता.पंढरपूर), उचेठाण (ता.मंगळवेढा) व माळशिरस (ता.जांभूड) या तीन ठिकाणी प्रत्येकी एक निविदा प्राप्त झाली होती. त्यामुळे पुन्हा १६ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान २७ निविदा प्राप्त झाल्या होत्या. शासनाकडून वाळू विक्रीसाठी जांभूड येथील नदीच्या पात्रापासून काही अंतरावर वाळू केंद्र उभारण्यात आले आहे.
सामान्यांना स्वस्त:त वाळू मिळाली पाहिजे : विखे-पाटील
जांभूड येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते फित कापून वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा खणी कर्म अधिकारी दिव्या वर्मा आदी उपस्थित होते.