सोलापूर : गेल्या एक महिन्यापासून शहरात पाच दिवसाआड, विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. उन्हाची तीव्रता आणि लॉकडाऊनच्या काळात सतत हात धुणे, कपडे धुणे या कारणांमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे, असा अजब दावा करत पंपहाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कारणही मनपा पुरवठा विभागातील अधिकारी देत आहेत.
मार्चपूर्वी शहरात तीन दिवसाआड व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता. १५ मार्चनंतर पाणीपुरवठा विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. औज बंधारा कोरडा पडला. उजनीतून बंधाºयात पाणी पोहोचायला उशीर झाला. या कालावधीत जुळे सोलापूरच्या टाकीतून पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला. एप्रिल महिन्यात मजरेवाडी, हत्तुरे वस्ती, शंकर नगर, रेवणसिध्देश्वर नगर, संत रोहिदास नगर या भागात मध्यरात्री पाणीपुरवठा करण्यात आल्याची तक्रार नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी केली होती.
एक मेपासून जुळे सोलापुरातील ज्ञानेश्वर नगर, सहस्रार्जुन नगर, भीमा नगर, पूनम नगर या भागात पाच दिवसाआड आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत़ यानंतर होटगी रोडवरील मोहितेनगर, बसवेश्वरनगर परिसरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उन्हाळ्यात शहरात जास्त पाणी लागते. अनेक सोसायट्यांमध्ये बोअरवेल असतात. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी कमी होते. त्यात मनपाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. दीड महिन्यात ३५ वेळा पंपहाऊसची वीज गेली़मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, उजनी, टाकळी, पाकणी या तीन पंपगृहावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय.
३० मार्चपासून किमान ३५ वेळा वीज गेल्याच्या नोंदी आहेत. पंपगृहाची वीज दोन तास गेली तरी पुढील सहा तासांचे काम विस्कळीत होते. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढतेच. पण आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावचे लोक शहरात आले आहेत. पाण्याची मागणी वाढली आहे. यंत्रणेवर थोडा ताण आला आहे. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. वीज गेली तर आणखी एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होतो. चावीवाल्यांची बैठक घ्या...- अधिकारी आणि चावीवाले वेगळी माहिती देत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाºयांनी चावीवाल्यांची पुन्हा बैठक घ्यावी. ज्या भागातून तक्रारी येत आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. लॉकडाऊनच्या काळात पाणीपुरवठा विभाग काम करतोय. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. परंतु, पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडले आहे. त्यात तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नगरसेवक सुभाष शेजवाल म्हणाले.