साेलापूर : महापालिका प्रशासनाने हैदराबादेतील रिमाेट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट या कंपनीच्या सहकार्याने तिसरा शहर विकास आराखडा (डिपी प्लॅन) प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येईल. सभेने तत्काळ निर्णय घेतल्यास, दसऱ्यापूर्वी नव्या आराखड्याचे काम सुरू हाेण्याची शक्यता आहे. पालिकेला प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज हाेता, परंतु रिमाेट सेंन्सर कंपनीने प्रतिहेक्टरी ६७५ रुपयांप्रमाणे काम करण्याची तयारी दाखविल्याचे उपअभियंता महेश क्षीरसागर यांनी सांगितले.
महापालिकेची पहिली विकास याेजना १९७८ साली लागू झाली. त्यानंतर, दुसरा विकास आराखडा १९९९ ते २०१७ या कालावधीसाठी निश्चित करण्यात आला. मात्र, हा आराखडा २००४ पासून अंमलात आला. या याेजनेची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. तत्पूर्वी पालिकेने नवा विकास आराखडा मंजूर करणे अपेक्षित आहे. राज्यातील महापालिकांचे नवे विकास आराखडे भाैगाेलिक माहिती प्रणालीवर आधारित असावेत. सर्वच माहिती डिजिटल स्वरूपात असावी, असे नगरविकास खात्याने यापूर्वी कळविले आहे. या कामातील तांत्रिक मदतीसाठी शासनाने १० कंपन्यांची सूची तयार केली आहे. या कंपन्यांच्या नियुक्तीसाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जून महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली हाेती. तीन कंपन्यांनी निविदा भरल्या हाेत्या. यात रिमाेट सेन्सिंग इस्ट्रुमेंट कंपनीचे सर्वात कमी दर आल्याचे नगररचना कार्यालयातून सांगण्यात आले. या कंपनीच्या नियुक्ताचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, ताे सभेच्या मंजुरीला पाठविण्यात येईल. मनपाचे सध्याचे क्षेत्र १७ हजार ८५७ हेक्टर आहे. यात ९०५ आरक्षणे आहेत. यातील ८२९ आरक्षणे मनपाची आहेत. नवी आरक्षणे निश्चित करणे, रस्ते, माेकळी मैदाने निश्चित करणे आदी कामे हाेणार आहे.
---
मनपाला माहिती देणे बंधनकारक
रिमाेट सेंन्सर कंपनीला महापालिका हद्दीतील रस्ते, आरक्षणे, माेकळी मैदाने व इतर बाबींचे विद्ममान नकाशे, प्रस्तावित नकाशे, विविध प्रकारचे सर्व्हे, ड्राेन मॅपिंग आणि आवश्यक साॅफ्टवेअर, माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यासाठी आणखी एका कंपनीने प्रतिहेक्टरी १,११० रुपयांचा खर्च दिला आहे.