सोलापूर: मार्च महिना उजाडल्यापासून सातत्याने सोलापूरच्यातापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून चाळिशी ओलांडत गुरुवारी चालू वर्षातले ४२.२ अंश सेल्सिअस तापमान येथील हवामान खात्याच्या प्रयोगशाळेत नोंदले गेले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सकाळी ९ वाजल्यापासूनच धगधगत्या उन्हाची तीव्रता सोलापूरकरांना जाणवू लागली आहे. यामुळे भोवळ येणे, डोके, कानशिलांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या टोप्यांचा वापर होऊ लागला आहे. प्रामुख्यानं नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने मंडळी बाहेर पडू लागली आहेत. दुपारच्या वेळी बहुतांश रस्त्यांवर तुरळक गर्दी जाणवू लागली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे २३ तारखेपासून इथल्या हवामान खात्याकडे ४०.७, ४०८, ४०.७, ४१.२, ४१.२ आणि आज (गुरुवारी) या वर्षातील सर्वोच्च ४२.२ म्हणजे १ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे. वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी शुभ्र, तलम वस्त्रे वापरावीत. दुपारच्यावेळी बाहेर पडू नये. लहान मुले आणि वृद्धांची दक्षता घ्यावी. मधुमेही, दम्याच्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी दिला आहे.
यंदा सर्वोच्च वाढ होईल?- गेल्या २८ वर्षांत सोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले आहे. यावर्षीची स्थिती पाहता यंदा त्यात वाढ होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा झालेले पर्जन्यमानही त्याला कारणीभूत असावे असे म्हटले जात आहे. एप्रिल,मे असे दोन महिने अद्याप उन्हाळा असल्यामुळे यंदा तापमानाचा २००५ सालातला उच्चांक मोडला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.