आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि २८ : सांगलीतील घटना अद्याप ताजी असतानाच टेंभुर्णी पोलिसांनी त्या घटनेच्या पुनरावृत्तीचे दर्शन घडवित रविवारी एका निष्पाप युवकास पोलीस ठाण्यातच बद-बद बदडले. सहा-सात पोलिसांनी बेल्टने, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करताना बेभान झाले होते. ना आरोपी... ना गुन्हेगार, असे असताना त्याला थर्ड डिग्रीचा वापर केला नाही, एवढेच काय ते कर्तव्य पोलिसांनी बजावले. संतोष उर्फ बापू हणमंत बोडरे (वय २४, रा. आढेगाव, ता. माढा) असे पोलिसांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे असे झाले, येथील शीतल अपार्टमेंट येथे सराफ असोसिएशन संघटनेचे विजयकुमार कोठारी यांच्याकडे बोडरे हा कामास आहे. तो शनिवारी सायंकाळी ६.०० वा. पुणे-सोलापूर महामार्गावर गर्दी का झाली ? हे पाहण्यासाठी गेला होता. तेथे काही जण बस वाहक आणि चालकास मारहाण करीत होते. त्याचे दृश्य तो आपल्या मोबाईलच्या कॅमेºयात बंदिस्त करीत होता. तो घटनेचे चित्रण करीत असतानाच जीपमधून चार-पाच पोलीस तेथे आले. त्यातील एकाने ‘तू फोटो का काढतोस’, असे धमकावत त्याला तेथेच मारहाण करण्यास सुरुवात झाली. एवढ्यावरच जनतेचे रक्षक म्हणून भक्षक बनलेल्या पोलिसांनी त्याला जीपमध्ये डांबले. जीपमध्ये मारहाण करीतच त्याला पोलीस ठाण्यात आणले. ‘सर, माझी काय चूक आहे. सांगा ना मला. मला मारु नका’ अशी विनंती करीत असताना पोलिसांना आली कुठली दयामाया. पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी त्याला कोठडीत बंद करण्याचे आदेश दिले. ढाकणेसह तेथील उपस्थित पोलिसांनी बेल्टने, लाथाबुक्क्याने त्याला बदडून काढले. दरम्यान, विजयकुमार कोठारी हे पोलीस ठाण्यात आले. तेव्हा मारहाणीचा प्रकार सुरु होता. कोठारी यांना पाहताच पोलिसाने आपल्या क्रूरकृत्यास पूर्णविराम दिला. कोठडीत जबर जखमी झालेल्या संतोष बोडरेला उपचारासाठी डॉ. काळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संतोषच्या पाठीवर जोराचा मार बसल्याने मणक्याला सूज आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ------------------बुधवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर मोर्चाजय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली व कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी बेजबाबदार पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना दोन दिवसात निलंबित करावे; अन्यथा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर रामोशी,बेडर,बेरड समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संजय चव्हाण,बंडू माने,भारत जाधव, सुरेश बोडरे, भारत पाटोळे, बापू जाधव, किरण जाधव, कुसुम पाटोळे, राजाबाई बोडरे आदी उपस्थित होते.
सोलापूरच्या ग्रामीण पोलीसांनी टेंभुर्णीतील निष्पाप युवकास ठाण्यातच केली बेदम मारहाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:53 PM