सोलापूर : मी मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूजची आहे़ त्यामुळे साहजिकच मला पुण्या-मुंबईपेक्षा सोलापूरच्या ग्रामीण भाषेत बोलायला अधिक आवडतं़ इथेच माझं शिक्षण झाले आहे़ सिनेसृष्टीत कुठेही असले तरी सोलापूरची नाळ कधीही तुटणार नसल्याचे मत ‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटातील आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटातील आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिने शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या़ या भेटीदरम्यान आर्चीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली़ चाहत्यांच्या गराड्यापासून सुटका करण्यासाठी तिला मोठी कसरत करावी लागली़..रिंकूने आपल्या सोलापूर भेटीत सर्वांनाच जिंकून घेतलं. ढोल - ताशाच्या गजरात मुलांनी तिचे स्वागत केलं.
मेकअप या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरू (आर्ची) ही सोलापुरात आली होती़ त्यावेळी तिच्यासोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर, मिलिंद सफाई, राजन ताम्हाणे, सुमुख पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ व अन्य सिनेकलाकार उपस्थित होते़ प्रारंभी सकाळच्या सत्रात आर्चीने वालचंद महाविद्यालयास भेट दिली़ यावेळी तिने विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या़ याचवेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आर्ची व चिन्मय उदगीरकर यांनी उत्तरे दिली.
वालचंद या संस्थेचे नाव जगभर आहे़ गुणवत्ता, अभ्यासक्रम, संस्थेची वाटचाल यामुळे येथे शिकलेल्या विद्यार्थ्यांचा झेंडा जगभर पोहोचला आहे़ त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या महाविद्यालयाची निवड केल्याचे रिंकू राजगुरू हिने सांगितल्याचे ‘वालचंद’चे प्राचार्य डॉ़ संतोष कोटी यांनी सांगितले़ यावेळी प्रा़ नागनाथ धायगोडे, प्रा़ संगमेश्वर नीला, प्रा़ हनुमंत मते आदी प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते़ यावेळी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यानंतर आर्चीने पत्रकारांशी संवाद साधून मेकअप या चित्रपटाची माहिती दिली़ दरम्यान, दुपारच्या सुमारास मेकअपच्या टीमने इंडियन मॉडेल स्कूलला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला़ प्रारंभी स्कूलचे सचिव अमोल जोशी आणि साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.