रवींद्र देशमुख
सोलापूर : भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते.
ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी त्यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, माझ्या आजोबापासून लळित कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध. लळित यांनी वकिली क्षेत्रात नाव कमाविले होते. उदय लळित यांचे आजोबा अण्णासाहेब यांना शहरात मानसन्मान होता. माझे बंधू कै. तानाजी आणि ॲड. भगवान वैद्य हे १९६९ - ७० साली हरिभाई देवकरण प्रशालेत एका वर्गात शिकत होते. त्यांची मैत्री होती, असेही ते म्हणाले. लळित यांचे कुटुंबीय लकी चौक ते हुतात्मा चौक या मार्गावर वास्तव्यास होते. त्यांच्या वहिनी सविता लळित या सोलापूर जनता बँकेच्या चेअरमन होत्या. आता त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस समर्थनगर येथे वास्तव्यास आहेत.