सोलापूर : यंत्रमाग कामगारांची मजुरी गेल्या एकोणीस महिन्यांपासून वाढविण्यात आली नाही. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, २७ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के मजुरी वाढीची अंमलबजावणी न केल्यास २८ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय लालबावटा संघटनेच्या दत्तनगर येथील कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस माजी आमदार नरसय्या आडम, किशोर मेहता, बाबू कोकणे, शाहबुद्दीन शेख, बापू साबळे, मोहन बडगू आदी उपस्थित होते.यावेळी आडम म्हणाले, आपण अत्यंत सनदशीर व कायद्याने आपला हक्क मागत आहोत. यंत्रमाग कारखानदारांना वेळोवेळी विश्वासात घेऊन करार संपताच निवेदन, मोर्चा, धरणे, एक दिवसीय लाक्षणिक संप, शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन मजुरी वाढीचा प्रश्न निकाली लागत नाही. ही कृती कामगारांप्रति घृणा व्यक्त करणारी आहे, म्हणून सिटूच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग कामगार स्वयंस्फूर्तीने मजुरी वाढीसाठी संपाच्या तयारीत आहेत.
याबाबत युनियनच्या वतीने कामगारांचे मत मागविण्यात आले होते. ९५ टक्के कामगारांनी मजुरी वाढीच्या समर्थनार्थ संपावर जाण्यास सहमती दर्शविली आहे, ही बाब पत्राद्वारे जिल्हाधिकारी, वस्त्रोद्योग मंत्री, कामगार मंत्री, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त, यंत्रमागधारक संघाला कळविण्यात आली आहे.
बैठक पुढे ढकललीच्यंत्रमाग कामगारांच्या सर्व संघटना, यंत्रमागधारक संघाचे पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बुधवारी सहायक कामगार आयुक्तांकडे घेण्यात येणार होती. ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.