सोलापूर : राज्य शासनाच्या प्रस्तावित धोरणात १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या कृषीपंपांना लघुदाब वाहिनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषीपंपांना उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीवरून वीजजोडणी देण्यात येईल. याशिवाय ६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. दरम्यान, एकाचवेळी पारंपरिक व सौरऊर्जा या अपारंपरिक स्रोताद्वारे वीजजोडणी देण्याचे धोरण आखण्यात येत असल्याची माहिती सोलापूरमहावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणी धोरणास त्वरित अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. व्हिडिओ कॉन्फ रन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकºयांनी वीजजोडणीसाठी रकमेचा भरणा केलेला आहे, तर सुमारे १.५० लाख शेतकºयांनी नवीन वीजजोडणीसाठी रितसर अर्ज भरलेले आहेत. परंतु, धोरणाअभावी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत राज्यातील शेतकºयांकडून वारंवार विचारणा होत असून, विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले होते.
कृषी, पशू, दुग्ध व मत्स्य विभागाशी समन्वय - महावितरणकडून आता नवीन जोडणी देताना कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग तसेच अन्य विभागांशी समन्वय साधून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल, याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. तसेच याबाबत आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावर संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना शासनाकडून मिळाल्या असल्याचेही महावितरणने सांगितले.