सोलापूर : महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी बैठक घेऊनही कचरा संकलन करणाºया घंटागाड्या अनेक प्रभागात नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक करीत आहेत. शहराच्या अनेक भागात उघड्यावर कचरा साचत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या २२५ घंटागाड्या आहेत. या घंटागाड्यांवर काम करणाºया कर्मचाºयांचा पगार आणि पीएफ जमा न केल्याने अनेक कर्मचाºयांनी काम सोडले आहे. कर्मचारी संपावर गेले होते. नव्याने कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी घंटागाड्यांच्या फेºयांचे नियोजन बिघडल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सफाई विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली.
घंटागाड्यांच्या नियोजनावर चर्चा करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आठ दिवस घंटागाड्याचे काम सुरळीत झाले होते. पण पुन्हा आठ दिवसांपासून अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील शेळगी, भवानी पेठ, मधला मारुती परिसर, अशोक चौक, नई जिंदगी, जुळे सोलापुरातील काही प्रभागात लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाºयांविरुद्ध होणारी कारवाई थंडावली आहे. सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन ते नवीवेस पोलीस चौकी, गुरुनानक चौक ते दयानंद कॉलेज चौक या प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा साठला आहे.
नई जिंदगी परिसरातील घंटागाड्याचे नियोजन बिघडलेले आहे. तीन दिवसांतून एकदा गाडी येत आहे. आम्ही लोकांना रस्त्यावर कचरा टाकू नका म्हणून सांगतो. पण लोक ऐकत नाहीत. गाडी वेळेवर येत नसल्याने रस्त्यावर कचरा साठत आहे. - परवीन इनामदार, नगरसेविका
महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या काळात आमच्या प्रभागातील उकिरडे बंद झाले होते. कारण वेळेवर घंटागाड्या येत होत्या. आता घंटागाड्यांचे नियोजन बिघडले आहे. संभाजी चौक ते शिवाजी चौक या मार्गावरही लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत. याबाबत आम्ही मुख्य सफाई अधीक्षकांकडे तक्रार करुनही सुधारणा झालेली नाही. - देवेंद्र कोठे, नगरसेवक
घंटागाड्यांचे नियोजन व्यवस्थित झाले आहे. नगरसेवकांनी तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांना गाड्या उपलब्ध करून देऊ. - त्रिंबक ढेंगळे-पाटीलउपायुक्त, मनपा