सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे ठरले आहेत. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवार १ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यापीठाचा १७ वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण https://youtu.be/T७८WXZNpSxg या लिंकवर होणार आहे. या कार्यक्रमास भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम यांची ऑनलाइन माध्यमातून प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पुरस्कारासाठी प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन मुडगी यांनी कामकाज पूर्ण केले. पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू डॉ देवेंद्रनाथ मिश्रा, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, प्रभारी कुलसचिव डॉ. घुटे आदी उपस्थित होते.
यांना जाहीर झाले पुरस्कार"
- १) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा
- २) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ. रावसाहेब पाटील, के. एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी
- ३) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. विकास घुटे, संगणकशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस
- ४) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार : शशिकांत बनसोडे, कार्यालय अधिक्षक, हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर.
- ५) राजश्री शाहू महाराज पुरस्कार: सुलभा गोविंद बनसोडे, भूशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस