सोलापूर : संततधार पावसातून शहरातून जाताना जरा जपूनच जा. रस्त्यावरील खड्ड्यांतून वाट काढीत सुरक्षितपणे वाहने चालवा. खड्डे बुजविले जातील, ही अपेक्षा तूर्त बाळगू नका. पाऊस थांबेपर्यंत खड्डे बुजविण्यात येणार नाहीत, अशी डेडलाईन महापालिकेने दिली आहे.
गेल्या चार दिवसात शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यामुळे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. पादचाºयांना खड्ड्यांचा मोठा फटका बसत आहे. वेगाने वाहन जवळून गेल्यावर खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडत चालल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील कोंतम चौक, मंगळवार बाजार, कन्ना चौक, जोडबसवण्णा ते पोटफाडी चौक, तेथून आॅफिसर्स क्लब, सात रस्ता ते मौलाली चौक, जेलरोड ते किडवाई चौक, कन्ना चौक ते घोंगडेवस्ती, जुना बोरामणीनाका, दयानंद कॉलेज ते सम्राट चौक, बुधवार बाजार, भारतीय चौक, विजापूरवेस, २५६ गाळा ते विडी घरकुल, कुंभारवेस, आसरा ते डी-मार्ट, आयएमएस स्कूल ते सैफुल चौक, आरटीओ कार्यालय रस्ता, मुरारजीपेठ, कल्पना टॉकीजमार्गे जुनी पोलीस लाईन रस्ता, आमराई अंतर्गत रस्ते, नवीपेठअंतर्गत रस्ते, दत्त चौक ते पंचकट्टा या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. खड्डे पडलेले हे रस्ते सखल भागातील आहेत. या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
ही आहे अडचण- महापालिकेच्या नगर अभियंता कार्यालयातर्फे सिव्हिल हॉस्पिटलसमोरील भांडार विभागात खड्डे बुजविण्यासाठी प्रिमिक्स तयार केले जाते. गेला महिनाभर सोलापुरात ढगाळ हवामान असल्याने प्रीमिक्स तयार करता आले नाही. बांधकामातील कचरा घालून खड्डे बुजविले जातात पण पाऊस पडत असताना याचा उपयोग होत नाही. त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत नागरिकांना खड्डे बुजविण्याची वाट पाहावी लागेल, अशी माहिती महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली.
नोकरीनिमित्त दुचाकीवरून दररोज प्रवास करावा लागतो. पावसामुळे नव्याने खड्डे झाल्याचे दिसत आहे. अवजड वाहनामुळे खड्डे वाढत चालले आहेत. महापालिकेने खड्ड्यांचा वेळीच बंदोबस्त करावा.- कुमार घेरडी, शिक्षक