सोलापूर : अध्यात्माकडून राजकारणाकडे वळलेले सोलापूरचे खासदार डॉ.सिद्धेश्वर स्वामींनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘लोकमत कट्ट्यावर’ सविस्तर चर्चा केली. त्यांचा आज वाढदिवसही आहे. ‘अगर इन्सानने इन्सानसे बगावत कर दी, तो इन्सानियत का क्या होगा, इन्सान इन्सानसे प्यार करना सीखे, इन्सान इन्सान से आदर करना सीखे’ असाच संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.
सोलापुरात कोणते प्रश्न आहेत ?खा.डॉ.जयसिद्धेश्वर स्वामी : पाण्यासह रेल्वे, सिंचन, शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सोलापूर शहराला एकेकाळी वैभव प्राप्त करून देणाºया पॉवर लुम्स काळाच्या ओघात मागे पडल्या आहेत. हा व्यवसाय पुनर्जीवित करून त्यांना ऊर्जावस्थेत आणणे महत्त्वाचे आहे. शहरात पाण्यासह रेल्वे, सिंचन, शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
सोलापुरातील पॉवर लुम, हॅँन्डलूमची समस्या आहे, तोडगा काय? केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी तसेच राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांची यासंबधी भेट घेणार आहे. सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या मदतीने पॉवर लूमचा प्रश्न मार्गी लावला जाईल. अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील उत्पादकांना कुठल्या समस्या भेडसावत आहे, त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या उद्योगांना ऊर्जितावस्थेत आणण्याचे मुख्य लक्ष्य राहील. दीड ते दोन लाख कुटुंबीय या उद्योगावर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करायचे आहे. पहिल्यांदाच राजकारणात आल्याने त्यांचे विषय सखोलपणे जाणून घ्यायचे आहे.
सिंचन वाढवण्यासाठी कुठली योजना आहे?अवर्षण क्षेत्र असल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पंढरपूर क्षेत्र सुज्लाम आहे. मंगळवेढा, अक्कलकोट, उत्तर-दक्षिण सोलापूरमध्ये पाण्याची समस्या भीषण आहे. उजनी धरणाचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातून देगाव फाटापर्यंत जाते. हे पाणी पुढे अक्कलकोट तसेच नागनसूरपर्यंत पोहचते. परिसरात एकरूप सिंचनासाठी निधी मिळाला, तर परिसराला सुज्लाम सुफ्लाम करता येईल. मिळणाºया निधीतून कुर्नूर धरणापर्यंत पाणी पोहचेल. नदी जोड प्रकल्प स्व.अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न होते. नितीन गडकरींनी यासंबंधी बरीच कामे केली आहेत. सोलापुरात या प्रकल्पातून लाभ झाला, तर चांगलेच आहे. सोलापुरात यंदा ३३ कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. श्रावण महिन्यात जनजागरणाचे कार्यक्रम त्यासाठी घेणार आहे.
विशेष रेल्वेगाडीची मागणी होतेय?दिल्ली-सोलापूरसाठी कर्नाटक एक्स्प्रेस ही एकच गाडी आहे. त्यात आरक्षणाची स्थितीही भयावह, त्रासदायक आहे. तिकिट कन्फर्म होत नाही. रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली तर प्रवाशांची सोय होईल. अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांची दोन गाड्या वाढवून देण्याची मागणी आहे. सोलापूर-हैद्राबाद एक विशेष ट्रेन असावी, यासाठी लोकसभेत प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करू. सोलापूर-मुंबई जादा रेल्वगाड्यांचा प्रश्न रेटून धरून प्रश्न मार्गी लावू. राजकारण हा माझा पिंड नाही, हे राष्ट्रकारण आहे. राष्ट्रसेवा आहे.
मतदारसंघात महामार्गांची आवश्यकता आहे?नितीन गडकरी परिवहन मंत्री झाल्यापासून देशात दोन, चार, सहा, आठ पदरी महामार्ग होत आहेत. सोलापूर-हैद्राबाद (सहा पदरी), सोलापूर-पुणे (चार पदरी), सोलापूर-विजापूर (सहा पदरी) कामे सुरू आहेत. सोलापूर ते गुलबर्गा मार्ग झाला आहे. सोलापूर ते अक्कलकोट चौपदरीकरणाचे काम वेगाने होत आहे. राज्य सरकार अंतर्गत छोट्या गावांना जोडणाºया रस्त्यावर वेगाने कामे होणे अपेक्षित आहे.
शेतीसाठी काय विशेष प्रयत्न राहतील ?अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी बोअर, विहिरीला पाणी आले तर अगोदर ऊ स लावायचे. गेल्या तीन वर्षात शेतकरी सुजाण झाला आहे. शेतकरी आता तुरीकडे वळला आहे. रोहिणी, मृगनक्षत्रात तो पेरणी करून टाकतो. तुरीचे पीक घेतल्यानंतर डिसेंबरमध्ये हरभराही पेरतो. थोडेफार शेतकरी केळी, उसाकडे वळतात. तुरीचे प्रमाण वाढल्याने बंपर पीक मिळाले आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्नरत राहणार.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले नाहीत?निवडणुकीदरम्यान सोलापूरमध्ये कुणीही कुणावर आरोपप्रत्यारोप केले नाहीत. केवळ उत्तम विचारांची देवाणघेवाण झाली. गेल्या ३२ वर्षांपासून धार्मिक क्षेत्रात असून सामाजिक, शैक्षणिक,प्रबोधनाचे काम करीत आहे. जैन, मराठा, धनगर, गुजराती, राजस्थानी, मारवाडी, कुणबी, कोष्टी, लिंगायत समाजासह मुस्लीम समाजात जाऊन पाच दिवस कुराणावर प्रवचन दिले. देशात अनेक धर्म, सिद्धांत आहेत. ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही धर्माच्या सिद्धांतावर आरोप करायचे नाही. कुठलेही आरोप करून ते खोडून काढायचे नाही असा सिद्धांत आहे.
गेल्या पाच वर्षांत बरीच कामे झाली- गेल्या पाच वर्षात कामे झालीच नाहीत असे म्हणता येणार नाही. लोकांच्या अपेक्षा मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. कामे झालीच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. बरीच कामे झाली आहेत. गेल्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी सोलापूरला स्मार्ट सिटी विकसित करण्याची घोषणा केली. वेगाने स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. लवकरच यासंबंधी बैठकीचे आयोजन करून कामांचा आढावा घेण्यात येईल.