सोलापुरात पेटला ‘मोदी अन् गांधी’ नावाचा वाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:12 AM2019-03-16T04:12:35+5:302019-03-16T04:13:10+5:30
कोनशिलेला काँग्रेसचा आक्षेप; झोपडपट्टीचे नाव भाजपाच्या नजरेत
- संतोष आचलारे
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरलेली मोदी अन् गांधी ही नावं सोलापुरात मात्र वादग्रस्त बनली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ३२ वर्षापूर्वी लावलेली कोनशिला मोदी नामक अधिकाऱ्यामुळे काँग्रेससाठी आक्षेपार्ह ठरली असतानाच गांधी नामक झोपडपट्टीही भाजपाच्या नजरेत आली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तथा जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच कोनशिला आहे. पुणे विभागाचे तत्कालिन विभागीय आयुक्त चंद्रशेखर मोदी यांच्या हस्ते १ जुलै १९८७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्याची माहिती या कोनशिलेवर दिसून येत आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने ही कोनशिला झाकण्यात आली नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली आहे, मात्र यात मोदी हे आडनाव असल्याने याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहरात असणाºया मोदी परिसरातील पोलीस चौकीवर असलेले मोदी नावही निवडणुकीच्या काळात चांगलेच चर्चेत आले आहे.
बाजूला असलेल्या भाजप कार्यालयासमोरच राहुल गांधी नगर वसाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनेक फलकांवर राहुल गांधी यांचे नाव झळकत आहे. त्यामुळे या नावाच्या फलकालाही भाजपने विरोध केला आहे. या परिसरात सामाजिक संस्था, शाळा व अन्य खासगी दुकानांसमोर सर्रास राहुल गांधी असे लिहिलेले दिसून येते.
मोदींचा उल्लेख असणारे फलक हटवा
जिल्हाधिकारी कार्यालयात, मोदी परिसरात व पेट्रोल पंप परिसरात मोदी यांच्या नावाने असलेले फलक अजूनही दिसून येत आहेत. हा आचारसंहितेचा भंग ठरणाराच विषय होणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या नावाने असलेले फलक त्वरित काढण्यात यावेत, अशी मागणी असणार असल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे.
गांधी नावाच्या फलकाचे काय?
भाजपा पक्ष कार्यालयासमोर राहुल गांधी यांचा उल्लेख असलेले फलक दिसून येतात. मग हे नाव असलेले फलक काँग्रेसला दिसत नाहीत का? केवळ मोदीद्वेषापोटी काँग्रेस असे राजकारण करीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.