सोलापूर : अकोलेकाटी - मार्डी रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता भैरी या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू विष प्राशनामुळे झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात आज स्पष्ट झाले; मात्र ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबतच्या चर्चेला पोलीस तपास तपासांतीच पूर्णविराम मिळणार आहे. दरम्यान, संयुक्ताच्या मृत्यूचा आणि सोमनाथ तरळनाळकर या युवकाच्या आत्महत्येशी कोणता संबध आहे का? याचाही तपास पोलीस करीत आहेत.
संयुक्ता भैरी (वय २२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर) हिच्या मृत्यूचा पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केल्यानंतर दयानंद महाविद्यालयातील सोमनाथ तरळनाळकर या युवकाने विजयपूर येथील गोलघुमटावरून उडी टाकून आत्महत्त्या केल्याची माहिती पुढे आली. त्यावरून या दोन्ही घटनांचा संबंध पोलिसांकडून तपासून पाहिला जात आहे.
संयुक्ताचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळला; त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. चोवीस तास झाले तरी अद्याप तिची ओढणी आणि बॅग पोलिसांना सापडली नाही. विशेष म्हणजे ओढणी व बॅगचा शोध पाच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाºयांकडून घेतला गेला; पण मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या वस्तू सापडल्या नाहीत. मृत सोमनाथ याच्या दुचाकीचाही शोध लागला नाही. संयुक्ता हिने स्वत:हून विष पिले की तिला कोणी विष पाजले ? याचा शोध लागला नाही. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. संयुक्ताच्या मित्र-मैत्रिणींकडे पोलिसांनी चौकशी केली. सोमनाथ तरनाळकर याने विजयपूर येथे जाऊन का आत्महत्या केली याचा शोध सुरू आहे. संयुक्ता हिच्या पश्चात आई,वडील, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. पद्मशाली समाज बांधवांनी कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, नगरसेवक देवेंद्र कोठे व प्रथमेश कोठे,सुरेश फलमारी, अशोक यनगंटी, लक्ष्मीनारायण आकेन, प्रवीण कारमपुरी, दशरथ गोप, श्रीनिवास रिकमल्ले यांनीही संयुक्तांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.