संताजी शिंदे
सोलापूर: हॉटेलमध्ये व्यवस्थापक असलेल्या पित्याला रात्रीचा डबा देऊन मुले घरी गेली, फोनवरून बोलताना मुलांना बेटा, मी आता जेवण केले आहे. तुम्ही झोपा.. सकाळी बोलू! असा निरोप दिलेल्या पित्याचा रात्रीतून घात झाला. दोन मुलांचे छत्र हरपल्याने परबळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
कैलास आप्पानाथ परबळकर (वय ५०, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हे रात्री सोलापूर-तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये होते. रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन मुलगा आकाश हॉटेलमध्ये आला होता. वडिलांबरोबर अर्धा तास गप्पा मारल्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा आपल्या घरी निघून गेला. शहरात पुन्हा संचारबंदी लागू होणार असल्याची माहिती समजल्यानंतर मुलगा आकाश याने वडील कैलास यांना फोन केला. फोनवर संचारबंदीबाबत बोलणे झाल्यानंतर कैलास परबळकर यांनी मुलांना बेटा तुमचं जेवण झालं आहे का? मी जेवण केले आहे, आता झोपतो.. तुम्हीही झोपा..
असे सांगून फोन ठेवला. मात्र रात्रीतूनच कैलास यांचा घात झाला. मुले आकाश व सागर हे वडिलांच्या फोनची वाट बघत होते, हॉटेल मालकाचा फोन आला आणि त्यांनी मुलांना बोलावून घेतले, तेव्हा वडील या जगात नसल्याचे समजले.
मृतदेह पाहताच पत्नीने फोडला हंबरडा..कैलास परबळकर हे मूळचे उमरगा तालुक्यातील येणेगुर या गावचे रहिवासी आहेत. ते राजू गुल्लापल्ली यांच्या सोलापुरातील सोलापूर-तुळजापूर रोडवर असलेल्या हॉटेल सौरभमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होते. त्यांची दोन्ही मुले गुल्लापल्ली यांच्याकडे कामाला होती. एक मुलगा पाकणी येथील वाईन शॉपमध्ये तर दुसरा मुलगा सागर हा सोलापूर शहरातील हॉटेलमध्ये काम करीत होता. ते सोलापुरात जरी राहत असले तरी त्यांचं अधूनमधून गावी येणेगुर येथे जाणं-येणं होत होतं. सध्या पत्नी येणेगुर या गावी होती. कैलास यांचा खून झाल्याची माहिती मुलांनी आईला दिली नव्हती. सायंकाळी मृतदेह गावी येणेगुर येथे घेऊन जाताना मुलांनी आईला फोन करून सांगितले. कैलास यांचे प्रेत पाहताच पत्नीने हंबरडा फोडून रडण्यास सुरुवात केली.
वडिलांचा असा घात होईल असे वाटले नव्हतेमी, माझे वडील आणि भाऊ आम्ही तिघे सोलापुरातच राजू गुल्लापल्ली यांच्याकडे कामाला होतो. आम्हा दोघा भावांचे लग्न झालेले असून, दोन-दोन मुली आहेत. वडील मॅनेजर म्हणून काम पाहत होते. मात्र ते हॉटेलमध्ये जेवण करत नव्हते, त्यांना घरचा डबा लागत होता. ते सरळ स्वभावाचे होते. त्यांचा असा घात होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी माहिती कैलास परबळकर यांचा मुलगा आकाश याने दिली.