सोलापूर/ मंगळवेढा : शेतीच्या कारणावरून मारहाण करून सासूला चावा घेणाऱ्या सुनेला आणि मुलाला मंगळवेढयाचे न्यायाधीश जी. एम. चरणकर यांनी एक महिना साधी कैद व एक हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद सुनावली आहे.
महादेव कृष्णा जाधव व अनिता महादेव जाधव असे शिक्षा सुनावलेल्या पती, पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी सुभद्रा कृष्णा जाधव यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली होती. साक्षीदार दत्तात्रय कृष्णा जाधव, केशर कृष्णा जाधव हे मरवडे-चडचण रस्त्यावर जाधव वस्ती येथे घरासमोर १९ जून २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता बसले होते. आरोपी महादेव आणि अनिता हे तेथे आले आणि सुभद्रा यांना एवढी मोठी शेती तुम्ही खाता, मला काहीतरी दया ना म्हणत शिवीगाळ केली. साक्षीदार दत्तात्रय जाधव हा आईला कशाला शिवीगाळ करून मारता म्हणत असताना त्यालाही मारहाण केली. तसेच सुभद्राच्या उजव्या हातास मनगटाजवळ चावा घेऊन त्यांना जखमी केले. तपास अधिकारी पोलीस नाईक हरिदास सलगर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात फिर्यादी सुभद्रा जाधव, वैद्यकीय अधिकारी पी.आर.शिंदे, दत्तात्रय केशर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई राजू चंदनशिवे यांनी सहकार्य केले.