केवळ भाषणाने पोट भरत नाही, सोनिया गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:35 PM2018-05-08T19:35:40+5:302018-05-08T19:35:40+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारार्थ विजयपुरात काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा

Sonia Gandhi's attack on BJP only | केवळ भाषणाने पोट भरत नाही, सोनिया गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल

केवळ भाषणाने पोट भरत नाही, सोनिया गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल

Next
ठळक मुद्दे काँग्रेसमुक्त भारताचे भूत नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर : सोनिया गांधीमोदीसाहेब तुमचे भ्रष्टाचार संपविण्याचे कोणते मॉडेल : सोनिया गांधी

विजयपूर : महागाई आकाशाला भिडली आहे. गोरगरिबांना त्रास होत आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटा प्रचार करीत आहेत. ते उत्तम भाषणकर्ते आणि अभिनेते आहेत. परंतु केवळ भाषणाने पोट भरत नाही. काँग्रेसने केलेला विकास नष्ट करण्याचे काम मोदी करीत असून, काँग्रेसविरुद्धचा प्रचार आता तरी थांबवा, असा हल्ला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केला.

विजयपूर विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी येथील बी. एल. डी. ई. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते. 

सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसमुक्त भारताचे भूत नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसले आहे. मोदीसाहेब तुमचे भ्रष्टाचार संपविण्याचे कोणते मॉडेल आहे, ते तरी सांगा? तुमच्या मंत्र्यांवर आणि तुमच्या परममित्राच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या आरोपाबाबत काहीतरी बोला, असा सल्ला देत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. 

बसवण्णांचे अनुभव मंटप ही काँग्रेसची संस्कृती आहे, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, राज्यातील काँग्रेस सरकारने केंद्राकडून एक नया पैसाही न घेता २२ लाख शेतकºयांचे कर्ज माफ केले आहेत. काँग्रेस पक्ष विकासासाठी कार्य करते. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे सरकार सर्व जाती व मागासवर्गीयांसाठी समर्पित आहे. कर्नाटकात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस संपविण्याची भाषा करतात. एक परंपरा असलेल्या काँग्रेसला संपविल्यास देशातील दीन, दलित आणि गरिबांचा कोणीही वाली राहणार नाही. यासाठी काँग्रेसला विजयी करा, असे त्यांनी आवाहन  केले. ‘जय हिंद-जय कर्नाटक’च्या घोषणा देत सोनिया गांधी यांनी प्रचारसभेचा समारोप केला.
 

Web Title: Sonia Gandhi's attack on BJP only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.