ज्यांचे उमेदवारी अर्ज फायनल झाले आहेत त्यांच्यासाठी भाव-भावकी, पाहुणे-रावळे, मित्र, कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत. हा प्रचार करताना ऊस, बांधाच्या अडीअडचणी, जुने वाद, आर्थिक अडचणी सोडवून आपल्यालाच पाठिंबा कसा मिळेल यासाठी मतदारांची मनधरणी सुरू आहे. हा प्रचार आता १३ जानेवारीपर्यंत अविरत सुरू राहणार असून, तोपर्यंत प्रचारात सातत्य टिकविणे, मतदारांना आपल्या सोबत ठेवण्याचे आव्हान पॅनलप्रमुख व उमेदवारांवर राहणार आहे.
पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड, सोशल मीडियावर धूम
निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काही उमेदवारांच्या अडचणी न सुटल्याने काही गावांमध्ये अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मात्र या अपक्षांचा आपल्याला फटका बसू नये म्हणून किमान आतातरी त्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी अनेक प्रमुख उमेदवार प्रयत्नशील आहेत, तर प्रमुख उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष गाठीभेटीसह सोशल मीडियाचा प्रथमच ग्रामीण भागात प्रचारासाठी मोठा वापर होत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे ऑडिओ, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने मतदारांमध्ये त्याची चर्चा आहे.