अक्षय आखाडे
जेऊर : गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मृगाच्या पावसाने जिह्यातील बहुतांश माळरानात आता आत्ता हिरवी चादर पसरली आहे. परिणामी कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने माळरानावर असलेली विवध रान फुले फुलली असल्याने माळरानावर वेगळाच बहर आल्याचं चित्र दिसत आहे.
रंगीबेरंगी फुललेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्याच्या कडेचा मोकळ्या जागा, माळरानावर असलेल्या वगळी, नाले, पडीक शेते, शेताचे बांध इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात विविधरंगी फुले फुलली आहेत. असंख्य वर्षायू वनस्पतीं रुजण्यासाठी आणि आपलं वंश पुढे टिकून रहावा यासाठी च ही सगळी धडपड. फुलोऱ्यात आलेल्या रानफुलांचा मध मिळवण्यासाठी मधमाश्याची सुद्धा धावपळ सुरू आहे. असंख्य किडे फुलपाखरे मुंग्या यांचा या गवताच्या आधारावर आपलाही वंश टिकवण्याचा अट्टाहास करताना दिसताहेत. दवबिंदूची दुलयी पांघरलेली हिरव्या कुरूनावर शिंपल्यासारखी दिसणारी ही रंगीबेरंगी रानफुले मुक्त चैतन्य पेरण्याचे काम करताना दिसत आहेत.
रानफुलांच्या आढळणाऱ्या वनस्पती पुढीलप्रमाणे
केनपट, दुरंगी बाभळी, टणटणी अथवा घाणेरी, ईचका, तरवड, सापकांदा, हसपळ, उरुळी, कुर्मुडी, गुलाबी उन्हाळी, पांढर फळी, सराता, पुनर्नवा, कुर्डु, धोतरा, कुळई, माकड शिंगी, पाथरी, भुई रिंगणी, गोधडी, काळमाशी रानभेडी, काचली, लाजाळू , बरबडा, कललावी, छोटा कळपा, कोरांती, कतर्मेंदा, चांदवेल इत्यादी प्रकारच्या रानफुलांच्या वनस्पती आढळतात.
रानफुलाचे संवर्धन होणे गरजेचे
या वर्षी विविधरंगी रानफुले दिसत असली तरी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून हे सगळंच कमी होताना दिसतंय. माळावरच्या मातीची धूप आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती काढल्यामुळे माळावरच्या मातीचा वरचा थरच गायब होतोय. आणि त्याबरोबरच त्यात सुप्तावस्थेत असलेल्या बिया ही नष्ट होऊन जाताहेत. निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या या रानफुलाचे संवर्धन करायलाच हवं.प्रतिक्रिया : पावसाळा आणि रानफुले यांचा अतूट संबंध आहे. आपल्याकडेही मृगाच्या पावसाबरोबर अनेक रानफुले माळावर, शेतात, उगवतात पावसाळा संपला की यांची पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागते.पण अलीकडे अनेक कारणांमुळे रानफुले आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत.त्याच संवर्धन होणे गरजेचे आहे.- विकास काळे केतूररानभाज्या, रानफुलाचे अभ्यासक