अक्कलकोट : सीना नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी सँड लॉबी आल्याचे समजताच तहसील कार्यालयातील महसूलचे पथक खानापूर येथे पोहोचले. त्यांना पाहताच वाळू उपसाच्या तयारीने आलेल्यांनी खोरे-पाटी टाकून धूम ठोकली.
याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २२ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता सिनेस्टाइलने हा खेळ रंगला.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार मागील महिनाभरापासून वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल आणि पोलिसांनी मोहीम आखली. या भागात पथके सक्रिय झाल्याने सँड लॉबीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. खानापूर येथे चोरून वाळू उपसा करण्यासाठी आल्याचे समजताच तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांचे एक पथक खानापूरमध्ये दाखल झाले.
या पथकात तलाठी मारुती कोळी (शेगाव), बसवराज कुंभार (केगाव बु.), कोतवाल अवधूत पुजारी (आळगी), जगदीश देसाई (खानापूर) हे तेथे दाखल झाले.
हातामध्ये खोरे आणि पाटी घेऊन आलेले नऊ जण हातातील साहित्य टाकून पळाले. या पथकाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, काेणीही हाती लागू शकले नाही.
याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात बबलू जमादार, अरबाज पटेल, प्रताप भुई, यलप्पा मडसनाळ (सर्व रा. खानापूर), शेखर कुंभार, आप्पशा सुभेदार, श्रीशैले इंडे, शांतप्पा चराटे (सर्व रा. तडवळ), यलप्पा पुजारी (रा. अंकलगी) या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोलीस नायक लक्ष्मण कांबळे करीत आहेत.