बुकिंवर कारवाई अन् धरपकड झाली सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात टाकळी आणि बरूर येथे ऑनलाइन मटका सुरू असल्याची बातमी लोकमतमध्ये झळकली. त्याच दिवशी मंद्रूप पोलिसांनी मटका चालकांची धरपकड सुरू केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
टाकळी येथे अनेक वर्षांपासून मटका व्यवसाय जोरात सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी मटकेबहाद्दरांची मोठी वर्दळ होती. उसाच्या फडातून ऑनलाइन मटका तर फोन पेवरून पेमेंटची सुविधा पुरवली जात होती. बरूर गावात चक्क उसाच्या फडात शेजारी टेबल मांडून ऑफलाइन मटका सुरू असल्याचे छायाचित्र लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्ताने मटका चालकांना जाग आली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मटक्याचे दुकान थाटलेच.
मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी स्वतः टाकळी येथे धाड टाकली. सराईत मटका चालक अंबाजी लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाखालील पुलाखाली बस्तान मांडले होते. पोलिसांनी अचानक धाड टाकली. हेमंत महादेव रगटे (रा. बरूर) आणि अंबाजी तुकाराम लाड (रा. टाकळी) या मटका चालकांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाइल असा २० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तसेच श्रीमंत माणिकअप्पा बेळकेरी आणि केदार कामाठी (दोघेही रा. चनेगाव, ता. इंडी) यांच्याकडील रोकड जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. आता पुन्हा मटका कधी सुरू होणार की कायमचा बंद होणार याकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मटकाबहाद्दरांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.