अक्कलकोट : एका शेतात कडवळ पिकात हातभट्टी दारू गाळत असताना पोलिसांनी अचानक धाड टाकली. पथकाला पहाताच हातभट्टी गाळणाऱ्याने धूम ठोकली. सांगवीतील या कारवाईत ५५ हजारांची दारू आणि रसायन नष्ट केले.
४ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सांगवी येथील शिवारात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मोहन ऊर्फ मोनेश्वर विश्वनाथ बंदीछोडे यांच्या शेतातील कडवळ पिकात आरोपी दारू तयार करीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन, बॅरलमध्ये भरलेले भट्टीचे साहित्य असा ५५ हजार ५९० रुपयांचे मुद्देमाल जप्त केला. धाड पडताच राजू गोपू चव्हाण संशयित आरोपीने तेथून धूम ठोकल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड यांनी दिली. या घटनेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार विपीन सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव माने, प्रमोद शिंपाळे, सीताराम राऊत यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी करीत आहेत.