सोपल देवदर्शनाला तर बबनदादा गावाला..राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दिग्गजांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:53 PM2019-07-27T16:53:45+5:302019-07-27T16:56:41+5:30
विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सोलापुरात अजित पवार यांनी घेतल्या मुलाखती
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मुलाखतींना बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी दांडी मारली. दिलीप सोपल श्रीशैल येथे दर्शनाला गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बबनदादा का आले नाहीत हे त्यांना विचारु. करमाळ्यातून संजय शिंदे इच्छुक असले तरी चार भिंतींच्या आड बसून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर बरेच लोक या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. काही लोकांना कारखान्यासाठी ५० कोटी पाहिजेत, कुणाला ६० कोटी पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की काहींच्या पतसंस्थांची चौकशी सुरू आहे. काहींनी एफआरपी दिलेली नाही.
काहींच्या कुक्कुटपालन संस्थेत तर काहींच्या दूध संघात गडबडी आहेत. काहींचे हात चौकशीत अडकले आहेत, अशी टीकाही पवार यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता केली. सत्ताधारी पक्षात राहिले की अधिकारी या चौकशा करण्याचे धाडस करीत नाहीत. अधिकारी सरकारच्या अधिपत्याखाली काम करतात. आपली गडचिरोलीला बदली होईल, शुक्लकाष्ट लागेल असे समजून अधिकारी काही करीत नाहीत. म्हणून पक्षांतर सुरू आहे. काही लोकांना आपले तिकीट कापले जाईल का याचे भय वाढीला लागले आहे, असेही पवार यांनी सांगितले.
मोहोळमधून स्थानिकाला संधी द्या : पाटील
- मुलाखतीवेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, बाळराजे पाटील, संकेत ढवळे आदी उपस्थित होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुक असले तरी स्थानिक माणसाला उमेदवारी मिळावी यासाठी आमचा आग्रह असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले.